Join us

Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 11:38 IST

Uber driver assaults woman: मुंबईतील गोरेगाव परिसरातून अत्यंत संतापजनक प्रकार समोर आला.

मुंबईतील गोरेगाव परिसरातून अत्यंत संतापजनक प्रकार समोर आला. एका उबेर बाईक चालकाने प्रवासी महिलेला शिवीगाळ आणि मारहाण केली. यानंतर पीडित महिलेने स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर आरोपी उबेर बाईक चालकाला अटक करण्यात आली. या घटनेवर भाजप नेते संदीप जाधव यांनी प्रतिक्रिया दिली. "उबर, ओला यांसारख्या कंपनींनी चालकांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासूनच त्यांना कामावर ठेवले पाहिजे", असे ते म्हणाले.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडिताने कामावर जाण्यासाठी उबेर बाईक बूक केली. त्यानंतर उबेर चालकांनी पीडितेला गोरेगाव पूर्वेकडील आयबी पटले रोडवर ड्रॉप केल्यानंतर तिला अश्लील शिव्या दिल्या. एका भाजप कार्यकर्त्यांनी मध्यस्ती करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. या संधीचा फायदा घेऊन उबेर बाईक चालक फरार झाला.

याप्रकरणी पीडिताने वनराई पोलीस ठाण्यात तक्रार उबेर बाईक चालकाविरोधात तक्रार दिली. यानंतर वनराई पोलिसांनी अवघ्या २० मिनिटात अटक केली. या घटनेबाबत भाजप नेते संदीप जाधव यांनी संताप व्यक्त केला. तसेच उबेर, ओला, झेप्टो आणि रॅपिडोसारख्या कंपन्यांनी चालकांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासूनच त्यांना कामावर ठेवले पाहिजे, असेही मत त्यांनी व्यक्त केले. या घटनेनंतर उबेर बाईकने प्रवास करणाऱ्या महिलांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले.

टॅग्स :गुन्हेगारीमुंबईमहाराष्ट्रउबर