Mumbai: नद्या, नाल्यांतील कचरा ‘ट्रॅश बूम’ करणार साफ
By सीमा महांगडे | Updated: September 2, 2025 14:10 IST2025-09-02T14:08:17+5:302025-09-02T14:10:25+5:30
Mumbai News: मुंबईमध्ये मोठा पाऊस पडला की नदी, नाल्यांतील तरंगता कचरा महापालिकेसाठी डोकेदुखी ठरत आहे.

Mumbai: नद्या, नाल्यांतील कचरा ‘ट्रॅश बूम’ करणार साफ
सीमा महांगडे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईमध्ये मोठा पाऊस पडला की नदी, नाल्यांतील तरंगता कचरा महापालिकेसाठी डोकेदुखी ठरतो. छोटे नाले आणि पर्जन्य जलवाहिन्यांमध्ये हा कचरा अडकून पाणी तुंबण्याचे प्रकार घडतात. त्यावर पालिकेने उपाय शोधला असून, पुढील तीन वर्षांत पश्चिम उपनगरांतील सहा महत्त्वाचे नाले-नद्यांमध्ये ट्रॅश बूम प्रणाली बसवून तरंगता कचरा गोळा केला जाणार आहे. या कामात पाँटूनवर बसविलेली कन्व्हेयर सिस्टीम वापरून प्लास्टिक व इतर तरंगता कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावली जाणार आहे.
मुंबईतील कांदळवन क्षेत्र प्लास्टिकमुक्त ठेवावे. ट्रॅशबूमचा वापर करून ते स्वच्छ ठेवावेत, असे राष्ट्रीय हरित लवादाने २०२० च्या निर्देशात नमूद केले आहे. याच पार्श्वभूमीवर पालिकेने नदी-नाल्यांमध्ये ट्रॅश बूमची यंत्रणा बसविण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. त्याकरिता अंदाजे २०० कोटींचा खर्च केला जाणार आहे, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.
दरवर्षी पावसाळ्यात समुद्रातून मोठ्या प्रमाणावर कचरा वाहून किनाऱ्यावर येतो. परिणामी समुद्रासह किनाऱ्यावरील अस्वच्छतेत आणि प्रदूषणात वाढ होते. त्यामुळे नाले, नद्यांवर ट्रॅश बूम बसवून हा तरंगता कचरा आधीच काढून घेतल्यास प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. ट्रॅश बूम यंत्रणा नाल्याच्या रुंदीप्रमाणे बसवता येईल, शिवाय पाण्याच्या जोरदार प्रवाहातही कार्यक्षम राहील, अशी व्यवस्था असेल, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.
ट्रॅश बूमची व्यवस्था
नाला/नदीचे नाव | ठिकाण |
गझबंदर नाला | वांद्रे |
मोगरा नाला | सिटी मॉल, अंधेरी |
एनएल रोड नाला | एनएल रोड दहिसर |
ओशिवरा नदी | विंडमिअर सोसायटी नजीक, ओशिवरा |
पोयसर नदी | मार्वे रोड , मालाड |
दहिसर नदी | कांदरपाडा , दहिसर |
ठिकाण
अन्य नाल्यांचे काय करणार ? पर्यावरणप्रेमींचा प्रश्न
- मुंबईत गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसात नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर तरंगता कचरा आढळला होता. त्यामुळे महापालिकेने पश्चिम उपनगरातील सहा ठिकाणी ट्रॅश बूम बसवण्याचा निर्णय घेतला. मात्र, इतर ठिकाणच्या नाल्यांकरिता पालिका काय उपाययोजना करणार, असा प्रश्न पर्यावरणप्रेमी उपस्थित करत आहेत.
- अनेक नाल्यांतील कचरा हा समुद्रकिनारी जमा होतो. त्यामुळे किनाऱ्यांच्या स्वच्छतेसाठी पालिकेकडून स्वच्छता मोहीमही राबविली जाते. मात्र, जर त्याचा काही उपयोगच होत नसेल तर हा पैशांचा अपव्यय आहे, अशी टीका ते करत आहेत.