दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2025 21:32 IST2025-08-17T21:31:40+5:302025-08-17T21:32:10+5:30

अनेक ठिकाणी पोलिसांनी स्वत: तर काही ठिकाणी सीसीटीव्हीच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली. यापुढेही फुटेज तपासले जाणार आहेत, त्यानुसार ई चलान पाठवले जातील. 

Mumbai Traffic police collected in 24 hours at Rs 1.13 crore on Dahi Handi Day due to traffic violations | दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप

दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप

मुंबई - शहरात दहीहंडीचा उत्सव जल्लोषात पार पडला. लाखोंची बक्षिस असलेल्या हंड्या फोडण्यासाठी अनेक गोविंदा पथके मैदानात उतरली होती. मात्र याच जल्लोषात मुंबई पोलिसांनी बेशिस्त गोविंदांवर चाप लावल्याचं समोर आले आहे. शनिवारी दिवसभरात वाहतूक पोलिसांनी १० हजाराहून अधिक ई चलान जारी केलेत. या चलनातून तब्बल १ कोटी १३ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. शहरातील अनेक नाक्यांवर वाहतूक पोलिसांची करडी नजर होती. 

माहितीनुसार, पोलिसांनी विना हेल्मेट वाहन चालवणे, चुकीच्या दिशेने येणे, ट्रिपल सीट प्रवास करणे, वेगाने वाहन चालवणे आणि अन्य नियमातंर्गत सर्वात जास्त कारवाई करण्यात आली आहे. दहीहंडीच्या दिवशी शहरातील प्रमुख चौकांमध्ये, प्रत्येक रस्त्यावर पोलीस तैनात होते. गर्दी आणि वाहतूक कोंडी सोडवण्यासोबतच नियम तोडणाऱ्यांवर सक्तीने नजर ठेवली जात होती. अनेक ठिकाणी पोलिसांनी स्वत: तर काही ठिकाणी सीसीटीव्हीच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली. यापुढेही फुटेज तपासले जाणार आहेत, त्यानुसार ई चलान पाठवले जातील. 

तर सण उत्सवात आनंदाच्या वातावरणात सुरक्षेशी तडजोड केली जाऊ शकत नाही. रस्त्यावर निष्काळजीपणे वाहन चालवून इतरांचा जीव धोक्यात घातला जातो. मुंबईत दहीहंडीनिमित्त हजारोंच्या संख्येने गोविंदा रस्त्यावर उतरले होते. ठिकठिकाणी वाहने उभी केली जात होती. गर्दीमुळे वाहतूक यंत्रणेवरही ताण पडला होता. त्यामुळे पोलिसांनी सुरक्षेसोबतच नियम तोडणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई केली आहे. सण असो वा इतर कुठलाही दिवस, वाहतुकीचे नियम सगळ्यांना सारखेच आहेत. कुठल्याही प्रकारचा बेशिस्तपणा चालणार नाही असं वाहतूक विभागाचे सहआयुक्त अनिल कुंभारे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, दहीहंडीवेळी २ गोविंदाचा मृत्यू झाला आहे. त्यात १४ वर्षाच्या मुलाचाही समावेश आहे. घाटकोपर येथील रुग्णालयात त्याला मृत घोषित केले. गावदेवी गोविंदा पथकातील रोहन मालवी हा आदर्श नगर परिसरात एका टॅम्पोत बेशुद्ध पडला. त्याला अलीकडेच काविळ झाली होती, त्यामुळे तो दहीहंडी फोडणाऱ्या पथकात नव्हता तर दुसरीकडे मुंबईच्या मानखुर्द येथे शनिवारी दुपारी हंडी बांधताना ३२ वर्षीय गोविंदाचा मृत्यू झाला. 
 

Web Title: Mumbai Traffic police collected in 24 hours at Rs 1.13 crore on Dahi Handi Day due to traffic violations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.