Mumbai Traffic: एलबीएस मार्गावर आता 'गेम चेंजर' पूल; ४० मिनिटांचे अंतर अवघ्या १० मिनिटांत पार होणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 16:01 IST2025-11-18T15:59:50+5:302025-11-18T16:01:29+5:30
लालबहादूर शास्त्री महामार्गावर कुर्ला ते घाटकोपरदरम्यान दिवसभर वाहनांच्या रांगा, सिग्नलवरील थांबलेली वाहने आणि उशिरा पोहोचणारे प्रवासी हे चित्र रोजचेच झाले

representative Image
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: लालबहादूर शास्त्री (एलबीएस) महामार्गावर कुर्ला ते घाटकोपरदरम्यान दिवसभर वाहनांच्या रांगा, सिग्नलवरील थांबलेली वाहने आणि उशिरा पोहोचणारे प्रवासी हे चित्र रोजचेच झाले आहे. या परिस्थितीवर कायमस्वरूपी उपाय म्हणून मुंबई महापालिकेने एक हजार ६०० कोटी रुपये खर्चाचा ४.२ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
कुर्ला पश्चिमेतील कल्पना टॉकीज ते घाटकोपर पश्चिमेतील पांखेस शाह बाबा दर्ग्यापर्यंत हा उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. सध्या ‘एलबीएस’वरील अंधेरी-घाटकोपर लिंक रोड जंक्शन, घाटकोपर स्टेशन रोड आणि संत नरसिंह मेहता रोड या तीन प्रमुख चौकात दिवसभर कोंडी होते. सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या कार्यालयीन वेळेत या मार्गावर वाहतूक अक्षरश: ठप्प होते. परिणामी प्रवासाचा वेळ दुप्पट वाढतो, तसेच प्रदूषणातही वाढ होते.
मेट्रोचे उंच पिलर, अन्य एका पुलामुळे कामाचे मोठे आव्हान विविध अडचणींमुळे दोन वर्षे पालिकेला या उड्डाणपुलाची प्रक्रिया सुरू करण्यात विलंब झाला आहे. त्यामुळे पुलाच्या कामाचा खर्चही वाढला आहे. पालिकेच्या म्हणण्यानुसार हा प्रकल्प तांत्रिकदृष्ट्या अतिशय गुंतागुंतीचा आहे. या मार्गावर आधीच मेट्रो २ आणि मेट्रो ७ च्या उंच स्तंभांचे जाळे उभे आहे.
महाराष्ट्र रेल्वे पायाभूत विकास महामंडळाचा एक पूलही या मार्गावर आहे. त्यामुळे नव्या उड्डाणपुलाला या सर्व संरचनांच्या वरून सुरक्षितपणे मार्गक्रमण करावे लागणार असल्याने आराखडा अत्यंत काळजीपूर्वक तयार करण्यात आला आहे. या पुलासाठी उंच स्तंभ, प्रीस्ट्रेस्ड गर्डर आणि वाहतूक चालू ठेवत बांधकाम केले जाणार आहे. हा प्रकल्प ‘मिशन ट्रॅफिक रिडक्शन’चा महत्त्वाचा भाग असून, पूर्व उपनगरातील वाहतुकीत सुधारणा घडवणारा ‘गेम चेंजर’ ठरेल, असे प्रशासनाचे मत आहे.
प्रवासाचा वेळ १० मिनिटांवर उड्डाणपूल पूर्ण झाल्यावर पश्चिम उपनगरे, पवई आणि ‘जेव्हीएलआर’मार्गे होणारी वाहतूक सुरळीत होईल. सध्या घाटकोपर ते कुर्ला प्रवासाला ३० ते ४० मिनिटे लागतात. परंतु, नंतर ही वेळ १० मिनिटांवर येईल, असा अंदाज आहे. पूल वेळेत पूर्ण करण्यासाठी वाहतूक पोलिस, एमएमआरडीए आणि मेट्रो प्राधिकरण यांच्याशी समन्वय साधून सविस्तर वाहतूक व्यवस्थापन आराखडा तयार केला जाणार आहे.