घर आणि कार्यालयांच्या खरेदीत दिल्लीला मागे टाकून देशात मुंबई अव्वल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 12:16 IST2025-10-22T12:15:52+5:302025-10-22T12:16:36+5:30
पुण्यानेही मारली बाजी, खरेदीचा बदलला ट्रेंड

घर आणि कार्यालयांच्या खरेदीत दिल्लीला मागे टाकून देशात मुंबई अव्वल
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : देशातील सात प्रमुख शहरांमध्ये ग्राहकांनी घर आणि कार्यालयाच्या खरेदीसाठी प्रामुख्याने मुंबईला पसंती दिली असून या यादीमध्ये पुण्यानेही बाजी मारल्याची माहिती बांधकाम उद्योगाचा अभ्यास करणाऱ्या एका सर्वेक्षण कंपनीने केलेल्या सर्वेक्षणाद्वारे पुढे आली आहे. विशेष म्हणजे, गेल्या तीन वर्षांपासून देशात घर आणि कार्यालयांच्या खरेदीमध्ये दिल्ली-एनसीआर येथे मोठी मागणी होती. मात्र, यंदाच्या वर्षी हा ट्रेण्ड बदलत असल्याचे या सर्वेक्षणातून दिसून आले आहे.
या वर्षांत मुंबईत जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांच्या कालावधीमध्ये मुंबईमध्ये मालमत्ता विक्रीने १ लाख ११ हजारांचा टप्पा ओलांडला. या कालावधीत झालेल्या मालमत्ता विक्रीद्वारे राज्य सरकारला १०,०९४ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला. मुंबईत चालू वर्षांत झालेल्या मालमत्ता विक्रीमध्ये ८० टक्के प्रमाण हे निवासी मालमत्तांचे आहे, तर उर्वरित २० टक्क्यांमध्ये कार्यालयीन तसेच व्यावसायिक मालमत्तांचा समावेश आहे.
१ काेटीपेक्षा अधिक किमतीची घरे
मुंबईच्या खरेदीत आणखीही एक वेगळा ट्रेण्ड दिसत आहे. ज्या घरांची किंमत एक कोटी रुपयांपर्यंत आहे त्यांच्या विक्रीला काहीसा ब्रेक लागला आहे, तर ज्या घरांची किंमत १ कोटी १० कोटींदरम्यान आहेत अशा आलिशान घरांच्या विक्रीने जोर पकडल्याचे दिसून येत आहे.
नवे प्रकल्प पसंतीस
द्वितीय श्रेणी शहरात ग्राहकांनी पुण्याला पसंती दिल्याचे दिसून आले आहे. पुणे परिसरात देखील मोठ्या प्रमाणावर नवे प्रकल्प साकारले जात आहेत. त्यामुळे तेथील खरेदीला ग्राहक पसंती देत आहेत. पुण्याने बांधकाम क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून आघाडी घेतली आहे. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून अनेक जण त्याला पसंती देत आहेत.
विक्रीमध्ये १२ टक्क्यांनी वाढ
गेल्यावर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत घर आणि कार्यालयांच्या विक्रीमध्ये १२ टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. मुंबईत घर व कार्यालयांच्या खरेदीला जी पसंती मिळत आहे, त्याचे विश्लेषण करताना या अहवालात असे नमूद करण्यात आले आहे की, गेल्या काही वर्षांपासून मुंबईत जी विकासकामे सुरू होती ती पूर्णत्वास गेल्यामुळे मुंबईत आता प्रवासाच्या वेळेत बचत होत आहे.
आजवर जे विभाग निवासी म्हणून ओळखले जात होते तेथे देखील कार्यालयांची उभारणी होत आहे. याचा परिणाम हा खरेदीच्या वाढत्या आकड्यांच्या रूपांतून दिसत आहे.