भावाच्या खोट्या सह्या करून १ किलो सोनेखरेदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 11:50 IST2026-04-01T11:50:27+5:302026-04-01T11:50:27+5:30
आयकर विवरण भरताना उघडकीस आला प्रकार

भावाच्या खोट्या सह्या करून १ किलो सोनेखरेदी
मुंबई : भावानेच भावाची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, दादर पोलिसांनी तीन भावांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दिनेश जैन, गौतम जैन आणि विमल जैन यांनी आपल्या मोठ्या भावाच्या नावाने बनावट कागदपत्रे व सह्या करून बँक खाते उघडले आणि त्याद्वारे एक किलो सोन्याची खरेदी केल्याचा आरोप आहे.
तक्रारदार ताराचंद जैन (वय ६३) हे मूळ राजस्थानातील बाडमेर जिल्ह्यातील रहिवासी असून, सध्या कोयंबतूर येथे कुटुंबासह राहतात. तक्रारीनुसार, १९८० च्या दशकात मुंबईत कुटुंबाच्या ज्वेलरी व्यवसायात काम सुरू केले होते. पुढे त्यांनी सावकारी व्यवसायही सुरू केला. काही काळानंतर त्यांनी व्यवसायाची जबाबदारी आपल्या भावांकडे सोपवली होती.
तक्रारीनुसार, २००५ मध्ये ताराचंद यांनी दिनेश जैन याला मुखत्यारपत्र दिले होते, मात्र त्यामध्ये त्यांच्या नावाने बैंक खाते उघडणे किंवा आर्थिक व्यवहार करण्याचा अधिकार नव्हता. तरीही, २०२१ मध्ये त्यांच्या पॅन कार्डचा वापर करून को-ऑपरेटिव्ह बँकेत बनावट सह्या करून खाते उघडण्यात आले.
आयकर विवरण भरताना उघडकीस आला प्रकार
बँक खात्यात विमल जैन यांनी एकूण ५७.५० लाख रुपये जमा केल्याचे आढळले. त्यानंतर या पैशांद्वारे रितुल ज्वेलर्सकडून सुमारे ५०.३२ लाख रुपयांचे एक किलो सोने खरेदी करण्यात आले. तसेच एका ज्वेलर्सला ७ लाख रुपये ट्रान्सफर करण्यात आले.
हे सर्व व्यवहार ताराचंद यांच्या बनावट स्वाक्षऱ्यांद्वारे केल्याचा आरोप आहे. आयकर विवरण भरत असताना ही बाब ताराचंद यांच्या लक्षात येताच त्यांनी चौकशी केली तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर त्यांनी दादर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून दादर पोलिस सोमवारी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे.