Mumbai: ‘माहे’श्रेणीतील पहिले पाणबुडीरोधक स्वदेशी जहाज येत्या सोमवारी नौदलात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 15:02 IST2025-11-18T15:00:45+5:302025-11-18T15:02:59+5:30
भारतीय नौदलाच्या ताफ्यात माहे श्रेणीतील उथळ पाण्यातील पहिले स्वदेशी बनावटीचे पाणबुडीरोधक जहाज सोमवारी २४ नोव्हेंबरला सामील होणार आहे.

Mumbai: ‘माहे’श्रेणीतील पहिले पाणबुडीरोधक स्वदेशी जहाज येत्या सोमवारी नौदलात!
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: भारतीय नौदलाच्या ताफ्यात माहे श्रेणीतील उथळ पाण्यातील पहिले स्वदेशी बनावटीचे पाणबुडीरोधक जहाज सोमवारी २४ नोव्हेंबरला सामील होणार आहे. यामुळे भारतीय नौदल आपल्या स्वदेशी जहाजबांधणी प्रवासात आणखी एक मैलाचा दगड गाठेल.
कोची येथील कोचीन शिपयार्ड लि.ने तयार केलेले हे माहे जहाज नौदलाच्या जहाज आरेखन आणि निर्मितीतील भारताच्या अत्याधुनिक आत्मनिर्भर भारत उपक्रमाचे प्रतिनिधित्व करते. आकाराने लहान तरीही शक्तिशाली असणारे हे जहाज, समुद्रकिनाऱ्यांवर वर्चस्व गाजवण्यासाठी आवश्यक असलेली चपळता, अचूकता आणि सहनशीलता या गुणांचे प्रतीक आहे. मारक क्षमता, गुप्तता आणि गतिशीलता यांच्या एकत्रीकरणातून, पाणबुड्यांच्या शोधासाठी, किनाऱ्यावर गस्त घालण्यासाठी उपयुक्त आहे.
स्वदेशी सामग्रीचा सर्वाधिक वापर
या जहाजाच्या निर्मितीमध्ये ८० टक्क्यांहून अधिक स्वदेशी सामग्रीचा वापर करण्यात आला आहे. माहे युद्धनौकेची रचना, बांधकाम आणि एकात्मता यांमधील भारताच्या वाढत्या प्रभुत्वाची साक्ष देते. मलाबार तटावर स्थित ऐतिहासिक किनारी शहर माहेच्या नावावरून जहाजाला नाव देण्यात आले आहे. या जहाजाच्या शिखरावर ‘उरूमी’ या कलरीपयट्टूमध्ये वापरण्यात येणाऱ्या, चपळता, अचूकता आणि प्राणघातक या गुणांचे प्रतीक असलेली तलवार कोरण्यात आली आहे.