मुंबईसह राज्याला सोमवारी पावसाने झोडपून काढले. मुंबईत सकाळी ८:३० पासून ४ तासांत सरासरी ७५ मिमी पाऊस झाला. उल्हास, अंबा, कुंडलिका, सावित्री नद्या धाेका पातळीवर गेल्या. घाेडबंदर, नाशिककडे जाणारी वाहतूक तुंबली.
मुंबई का तुंबली?
सकाळी ८:३० ते दुपारी १२:३० दरम्यान सरासरी ७५ मिमी पावसाची नोंद झाली. पावसामुळे नाल्यांतून वाहणाऱ्या पाण्यासोबत कचराही वाहून गेला. याचा परिणाम नाले व गटारे ब्लॉक झाली. त्यामुळे भरतीची वेळ नसतानाही हे पाणी रस्त्यावर आल्याने पाणी साचले, अशी माहिती वेगरिज ऑफ दी वेदरचे राजेश कपाडीया यांनी दिली.
शाळांना आज सुट्टी
भारतीय हवामान खात्याने मंगळवारीही रेड अलर्ट दिला आहे. या पार्श्वभूमीवर, मुंबई, ठाण्यातील सर्व शासकीय, खासगी, महापालिका शाळा आणि महाविद्यालये यांना सुट्टी देण्यात आली आहे.
झाड पडून एकाचा मृत्यू
पावसामुळे सकाळी साडेदहाच्या सुमारास सहार रोड येथील पारसी वाडीत झाड पडून जयंत गोसावी हे जखमी झाले. त्यांच्या कुपर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर नेपेयन्सी रोड येथील शिमला हाऊस परिसरातील गोदरेज बाग हैदराबाद इस्टेट कॉटर्समधील सार्वजनिक बांधकाम विभागाची संरक्षक भिंत झाडावर पडली. हे झाड पडून सतीश तिरके हे जखमी झाले. नायर रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल केले असता रुग्णालयाने त्यांना मृत घोषित केले. तर दुपारी पावणेतीनच्या सुमारास वांद्रे येथील भारत नगर परिसरातील वाल्मीकी नगरातील नाल्यात एक जण वाहून गेला.
महामुंबईतील चाकरमान्यांचा जीव टांगणीला, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा; रस्ते तुंबले, गाड्या फसल्या, लोकलचा लेटमार्क; वरुन अविरत जाेरधारा, खाली गुडघाभर पाणी
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील लोकल ३० ते ३५ मिनिटे उशिराने धावत होती. तर हार्बर मार्गावर लोकल ४० ते ४५ मिनिटे उशिराने धावत होत्या. पश्चिम मार्गावरील अनेक लोकलनाही ३० मिनिटांचा लेटमार्क लागला. परिणामी सकाळी ४८ तर दिवसभरात १२० पेक्षा जास्त लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. तर पश्चिम रेल्वची वाहतूक पावसामुळे विलंबाने सुरू होती. मुंबई लाइफलाइन विलंबाने सुरू असल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले.
सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी संततधार मुसळधार पावसामुळे सखल भागात जागोजागी पाणी तुंबले. यामुळे ८ बेस्ट आगारांतील तब्बल ४६ हून अधिक बसमार्ग वळविण्यात आले. अचानक झालेल्या या बदलामुळे ही मुंबईकरांची धांदल उडाली. कार्यालय गाठण्यासाठी अनेकांनी बसऐवजी पर्यायी वाहनांनी प्रवास सुरू केला. मात्र, वाहतूक कोंडीत अडकल्याने चाकरमारन्यांचा लेटमार्क लागला.
मुसळधार पावसातही मेट्रो गाड्या मात्र निर्धारित वेळेत धावत होत्या. तसेच एमएमएमओसीएलने अतिरिक्त गाड्या तैनात ठेवल्या होत्या. उपनगरांत वाहनांच्या रांगा लागल्याने ऑफीस गाठण्यासाठी मेट्राे कामी आली. मोनोच्या फर्टिलायझर टाऊनशिप या स्थानकावर स्लॅबमधून पाणी गळती झाल्याने बादल्या ठेवण्याची वेळ महा मुंबई मेट्रो संचलन मंडळावर आली. तांत्रिक अडचणींमुळे गाड्या रद्द करण्याची वेळही मोनो प्रशासनावर आली.
मुसळधार पावसाचा मोठा फटका विमान सेवेला बसला असून, मुंबईत उतरणाऱ्या नऊ विमानांनी मुंबईत उतरणे टाळले. तर मुंबईतून उड्डाण करणारी अनेक विमाने कमी दृश्यामानतेमुळे विलंबाने उड्डाण करीत होती. विमान सेवेला विलंब झाल्यामुळे अनेक विमान कंपन्यांनी प्रवाशांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. तसेच प्रवाशांनी विमान कंपन्यांशी संपर्क करून प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन कंपन्यांनी केले आहे.