"मदतीसाठी किंचाळले, पण कोणी थांबले नाही"; गोरेगावमध्ये इन्फ्लुएन्सरचा विनयभंग, ७० हून अधिक फुटेज तपासून आरोपीला पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 14:41 IST2025-12-01T14:35:33+5:302025-12-01T14:41:36+5:30

प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरची भररस्त्यात छेडछाड काढल्याची घटना मुंबईत घडल्याने खळबळ उडाली.

Mumbai Shock Popular Social Media Influencer Molested in Broad Daylight Arrest Made After Viral Pos | "मदतीसाठी किंचाळले, पण कोणी थांबले नाही"; गोरेगावमध्ये इन्फ्लुएन्सरचा विनयभंग, ७० हून अधिक फुटेज तपासून आरोपीला पकडले

"मदतीसाठी किंचाळले, पण कोणी थांबले नाही"; गोरेगावमध्ये इन्फ्लुएन्सरचा विनयभंग, ७० हून अधिक फुटेज तपासून आरोपीला पकडले

Mumbai Crime: गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका २२ वर्षीय लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरसोबत दिवसाढवळ्या विनयभंगाची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. २६ नोव्हेंबर रोजी घडलेल्या या प्रकारामुळे मुंबईतील महिला सुरक्षेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेनंतर दोन दिवसांनी, गुरुवारी  पीडित तरुणीने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली. तिची ही पोस्ट वाऱ्यासारखी पसरताच मुंबई पोलिसांच्या एक्स हँडलपर्यंत पोहोचली आणि तातडीने प्रशासकीय हालचालींना वेग आला.

पीडित तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, २६ नोव्हेंबरच्या रात्री ती गोरेगाव पश्चिम येथील रॅडिसन हॉटेलजवळील एका पुलावर आपल्या मोबाइलवर बोलत उभी होती. याच वेळी एका अनोळखी व्यक्तीने तिच्याजवळ येऊन तिला अयोग्यरित्या स्पर्श केला आणि त्वरित तो पूल ओलांडून पळून गेला. या अनपेक्षित प्रकारामुळे गोंधळलेल्या अवस्थेतही तरुणीने त्या व्यक्तीचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या भागातील वाहनांच्या तीव्र गर्दीमुळे आणि वाहतूककोंडीमुळे तिला त्याचा माग काढणे शक्य झाले नाही.

"मी रडत मदतीसाठी ओरडत होते"

या घटनेनंतर रस्त्याच्या मधोमध उभी राहून ती मदतीसाठी किंचाळत होती आणि रडत होती, पण दुर्दैवाने रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांनी तिला कोणतीही मदत केली नाही. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, या तरुणीने आपल्या पोस्टमध्ये तातडीने पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचा उल्लेख केला आहे. "मी १०० नंबर, महिला सुरक्षा हेल्पलाइन १०३ आणि आपत्कालीन नंबर यापैकी एकाही नंबरवरून संपर्क साधला, पण मला प्रतिसाद मिळाला नाही," असा गंभीर आरोप तिने केला. मुंबईसारख्या सुरक्षित शहरात धोक्याच्या वेळी कोणतीही मदत न मिळाल्याने तिने तीव्र निराशा व्यक्त केली होती.

पोस्ट व्हायरल होताच पोलीस यंत्रणा कामाला!

तरुणीची पोस्ट मुंबई पोलिसांच्या एक्स हँडलपर्यंत पोहोचताच पोलीस यंत्रणेच्या हालचालींना वेग आला. गोरेगाव पोलिसांनी तातडीने तरुणीच्या तक्रारीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आणि आरोपीचा शोध सुरू केला. आरोपीचा माग काढण्यासाठी गोरेगाव, मालाड आणि बांगूरनगर पोलीस ठाण्याच्या मदतीने पथके तयार करण्यात आली. या पथकांनी परिसरातील तब्बल ७० ते ८० सीसीटीव्ही फुटेज तपासले.

तांत्रिक तपास आणि सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी आरोपी कुलदीप बुधीराम कनोजिया (२७) याला गोरेगावच्या उद्योगनगर परिसरातून ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली, आणि त्याला तत्काळ अटक करण्यात आली. पीडितेनेही आरोपीला ओळखले आहे. मुंबई पोलिसांनी जलद कारवाई करून आरोपीला पकडल्यानंतर तरुणीने दुसरा व्हिडीओ शेअर करत त्यांचे आभार मानले. मात्र, तिने असेही नमूद केले की, मुंबई पोलिसांच्या 'एक्स' पोस्टनंतरच कारवाईला अधिक गती मिळते.

Web Title : गोरेगांव में इन्फ्लुएंसर से छेड़छाड़; पुलिस की देरी, आरोपी गिरफ्तार।

Web Summary : गोरेगांव में एक सोशल मीडिया इन्फ्लुएंसर से छेड़छाड़ हुई। मदद के लिए चिल्लाने पर भी कोई नहीं रुका। सोशल मीडिया पर पोस्ट वायरल होने के बाद पुलिस हरकत में आई और सीसीटीवी फुटेज के आधार पर आरोपी को गिरफ्तार किया।

Web Title : Influencer molested in Goregaon; delayed police response, accused arrested.

Web Summary : A social media influencer was molested in Goregaon. Despite her cries for help, no one intervened. Police acted after her social media post went viral, leading to the accused's arrest based on CCTV footage.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.