Mumbai: एक्स्प्रेस वेवरील पुलांच्या डागडुजीसाठी १३६ कोटींचा खर्च, एकनाथ शिंदेंच्या सूचनेनंतर महापालिका सरसावली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 15:27 IST2025-11-21T15:25:40+5:302025-11-21T15:27:50+5:30
Mumbai News: पूर्व, पश्चिम द्रुतगती महामार्गावरील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) तसेच मुख्य रस्त्यावरील महत्त्वाच्या उड्डाणपुलांची महापालिकेने तातडीने डागडुजी हाती घेतली आहेत.

Mumbai: एक्स्प्रेस वेवरील पुलांच्या डागडुजीसाठी १३६ कोटींचा खर्च, एकनाथ शिंदेंच्या सूचनेनंतर महापालिका सरसावली
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: पूर्व, पश्चिम द्रुतगती महामार्गावरील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) तसेच मुख्य रस्त्यावरील महत्त्वाच्या उड्डाणपुलांची महापालिकेने तातडीने डागडुजी हाती घेतली आहे. 'पूर्व द्रुतगती'वरील 'एमएसआरडीसी'च्या पुलाची मास्टिक टाकून सुधारणेसाठी ६२ कोटी, तर 'पश्चिम द्रुतगती'वरील पुलांच्या डागडुजीसाठी ७३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
गेल्या काही वर्षातील वाहतुकीचा
प्रचंड ताण तसेच पावसामुळे उड्डाणपुलांच्या पृष्ठभागांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे रीसर्फेसिंग, स्ट्रक्चरल दुरुस्ती आणि ड्रेनेज सुधारणा अत्यावश्यक आहे.त्याकरिता मंगळवारी मंत्रालयात मुंबईतील सर्व उड्डाणपुलांची सद्यःस्थिती व डागडुजीच्या कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी सर्व उड्डाणपुलांची तातडीने डागडुजी करावी. रस्त्यांच्या पृष्ठभागावर नवीन थर (रीसरफेसिंग) टाकावा. रस्त्यावरील खडबडीत जागी ठिगळ काढून रस्ता गुळगुळीत करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या होत्या. त्यानंतर पालिका प्रशासन तातडीने काम हाती घेत आहे.
सातत्याने कोट्यवधींचा खर्च
'एमएमआरडीए'ने २०२२ मध्ये पूर्व व व पश्चिम द्रुतगती महामार्ग पालिकेच्या ताब्यात दिले. मात्र, त्यांची प्रचंड दुरवस्था होत असल्याने त्यावर सातत्याने पालिकेकडून कोट्यवधींचा खर्च होत आहे. मे २०२४ मध्ये पावसाळापूर्व डागडुजीसाठी १७६ कोटी, तर सप्टेंबर २०२४ मध्ये पुन्हा सव्हिस रोडच्या डागडुजीसाठी १,५०० कोटींची निविदा काढली होती.
रीसफेंसिंग, फूटपाथ, चेंबरची कामे
'पश्चिम द्रुतगती'वरील अंधेरी, विलेपार्ले, गोरेगाव, डहाणूकरवाडीपर्यंतच्या उड्डाणपुलांच्या पृष्ठभागाचे मास्टिक अस्फाल्ट रिसर्फेसिंग करण्यात येणार आहे.
त्याचबरोबर भेगा भरणे, लेन माकिंग्स नव्याने रंगवणे, पादचारी मार्गाची डागडुजी या कामांचाही समावेश आहे. 'पूर्व द्रुतगती'वरील घाटकोपर, मानखुर्द, विक्रोळी, ठाणे दिशेकडील पुलांवरही मास्टिक रीसर्फेसिंग, स्टॉर्म वॉटर ड्रेन दुरुस्ती, फूटपाथ दुरुस्ती, चेंबर लेव्हल अॅडजेस्टमेंट अशी कामे केली जाणार आहेत.
'ट्रेंच रीस्टेटमेंट'वर अधिक भर
पूर्व व पश्चिम द्रुतगती महामार्गावर 'ट्रेंच रीस्टेटमेंट' हा महत्त्वाचा भाग आहे. जलवाहिनी, दूरसंचार, गॅस पाइपलाइन आदींसाठी रस्ते खोदल्यानंतर ते योग्य पद्धतीने ते बुजवले जात नाहीत. त्यामुळे उंच-खोल पृष्ठभाग तयार होतो. तसेच पुढे मोठे खड्डे पडतात. त्यामुळे अशा ठिकाणचे रस्ते तांत्रिक पद्धतीने भरून मूळ स्तरावर आणले जाणार आहेत.