GBS Cases in Mumbai: गुलेन बॅरी सिंड्रोम मुंबईला नवीन नाही!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 12:21 IST2025-02-08T12:18:50+5:302025-02-08T12:21:19+5:30
GBS Cases in Mumbai News: आजाराचा सामना करण्यासाठी मुंबई महापालिकेचा आरोग्य विभाग सज्ज असून, व्हेंटिलेटरसह १५० आयसीयू बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.

GBS Cases in Mumbai: गुलेन बॅरी सिंड्रोम मुंबईला नवीन नाही!
मुंबई : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुलेन बॅरी सिंड्रोमचे (जीबीएस) रुग्ण सापडत असल्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातवरण आहे. मात्र, 'जीबीएस'ची लक्षणे असलेले रुग्ण मुंबईच्या आरोग्य व्यवस्थेला नवीन नाहीत.
मुंबईतील विविध रुग्णालयांत या आजाराची लक्षणे असलेली रुग्ण वर्षभर उपचार घेत असतात. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याची गरज नसल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. या आजाराचा सामना करण्यासाठी मुंबई महापालिकेचा आरोग्य विभाग सज्ज असून, व्हेंटिलेटरसह १५० आयसीयू बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.
अंधेरीत सापडला संशयित रुग्ण
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, पुणे जिल्हा वा परिसरात १७३ पेक्षा जास्त या आजराचे संशयित रुग्ण सापडले असून, १४० रुग्णांना 'जीबीएस'चे निदान झाले आहे. तर सहा संशयितांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी एकाचा मृत्यू 'जीबीएस'ने झाल्याचे निश्चित झाले आहे.
अंधेरीत शुक्रवारी जीबीएसचा संशयित रुग्ण सापडला असून, त्याला सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल केले आहे. मात्र, या रुग्णाचे निदान निश्चित झाले नसल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाने कळविले आहे. २१ रुग्ण राज्यात व्हेंटिलेटरवर आहेत.
एक-दोन रुग्णांवर उपचार
बहुतांश खासगी रुग्णालयांत या आजराचे एक ते दोन रुग्ण महिन्याला उपचार घेत असतात. हा आजार एका रुग्णामुळे दुसऱ्या रुग्णाला होत नाही. विषाणू किंवा जिवाणूमुळे होणारा हा आजार आहे. कोणत्या संसर्गाने हे अद्याप कुणी सांगू शकलेले नाही. या आजारावर उपचार उपलब्ध आहेत, असे नानावटी रुग्णालयातील संसर्गजन्य रोगतज्ज्ञ डॉ. हर्षद लिमये यांनी सांगितले.
रुग्णसंख्या १७३ वर
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, जीबीएस रुग्णांची संख्या बुधवारी १७३ वर पोहोचली असून, ५५ रुग्ण आयसीयूमध्ये, तर २१ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. ते बहुतांश रुग्ण पुण्यातील आहेत.
इम्युनो ग्लोबीनचा कोर्स
विषाणू आणि जीवाणूच्या संसर्गामुळे जीबीएस होतो. संसर्गामुळे मज्जातंतूसंस्थेवर दुष्परिणाम होतो. हात आणि पायांच्या रक्तवाहिन्या अशक्त होतात. हात-पाय हालचाल करणे शक्य होत नाही.
श्वसन यंत्रणेवर काहीवेळी परिणाम होतो. त्यामुळे रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होतो. अशावेळी ईएमजी-एनसीव्ही ही नसांची चाचणी केली जाते.
पाठीच्या मणक्यातून काहीवेळा पाणी काढून चाचणी केली जाते. त्यानुसार सलाइनद्वारे इम्युनो ग्लोबीनचा कोर्स दिला जातो, असे बॉम्बे हॉस्पिटलचे न्यूरॉलॉजिस्ट डॉ. निर्मल सूर्या म्हणाले.