Join us

Mumbai Rain Updates : घरीच थांबा! अतिवृष्टीमुळे कार्यालये बंद ठेवण्याचे पालिकेचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2020 10:41 IST

Mumbai Rain Updates : मुंबईत अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. याच दरम्यान मुंबई महापालिकेने लोकांना घरीच थांबण्याचे आणि अतिवृष्टीमुळे कार्यालये बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. 

मुंबई - मुंबईसह उपनगरात रात्रीपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुसळधार पावसाने अनेक सखल भागात पाणी साचले आहे. दादर, माटुंगा, वरळी, लालबाग, सायन, कुर्ला, अंधेरीसह अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. पावसामुळे रस्त्यांवरील वाहतुकीवर परिणाम झाला असून वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. पुढील 24 तासांत मुंबईत अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. याच दरम्यान मुंबई महापालिकेने लोकांना घरीच थांबण्याचे आणि अतिवृष्टीमुळे कार्यालये बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. 

पालिकेने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे. 'बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात काल रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसाच्या व हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये, आस्थापना इत्यादी बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुंबई शहर व उपनगरात आज मुसळधार पर्जन्यवृष्टीची शक्यता आहे. समुद्रात दुपारी 12.47 च्या सुमारास भरती येणार आहे. अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, समुद्रकिनारे तसेच पाणी भरलेल्या ठिकाणापासून लांब राहावे" असे आवाहन मुंबई महापालिकेकडून नागरिकांना करण्यात आले आहे.

काही ठिकाणी पाणी साचल्याने बेस्ट बसेसचे मार्ग वळवळण्यात आलेत. यामध्ये सायन रोड नंबर 24, गांधी मार्केट, किंग्ज सर्कल, हिंदमाता यांचा समावेश आहे. अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये, आस्थापना इत्यादी आज बंद ठेवण्याचे महापालिकेने आवाहन केले आहे. पावसाचा लोकलवरही परिणाम झाला आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकलची वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. हार्बर रेल्वे मार्गावरीलकुर्ला ते सीएसएमटी दरम्यान वाहतूक बंद तर मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे.

 

टॅग्स :मुंबईपाऊसमुंबई मान्सून अपडेट