मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात शनिवार दिनांक १८ जुलै २०२१ च्या रात्रीपासून पावसाने जोर धरला. हा पाऊस पहाटे ४ वाजेपर्यंत सातत्याने सुरू होता. त्याअनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेची सर्व यंत्रणा, २४ विभाग कार्यालये, मुख्य आपत्कालीन नियंत्रण कक्ष आणि २५ सहाय्यकारी नियंत्रण कक्ष, मुंबई अग्निशमन दल आदी सर्व यंत्रणा रात्रभर अव्याहतपणे कार्यरत होती. त्याचबरोबर महापालिकेची सर्व प्रमुख रूग्णालय आणि उपनगरीय रुग्णालये यांना देखील खबरदारीची उपाययोजना म्हणून आवश्यक त्या कार्यवाहीसाठी तत्पर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
याचबरोबर बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात विविध ६० ठिकाणी असणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्वयंचलित हवामान केंद्रांवर या पावसाची नियमित नोंद घेतली जात होती. स्वयंचलित हवामान केंद्रांद्वारे उपलब्ध होत असलेल्या पावसाच्या या आकडेवारीचे सातत्यपूर्ण विश्लेषण हे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षामध्ये करण्यात येत होते व त्यानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना देखिल महापालिकेच्या विभाग कार्यालयांना रात्रभर नियमितपणे देण्यात येत होत्या.