Join us  

Mumbai Rain Updates: मुंबई, ठाणे, कोकणातील शाळा-कॉलेजांना गुरुवारी सुटी जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2019 12:24 AM

गेल्या २४ तासांत मुंबई, ठाणे, कोकण पट्ट्यात धुवाधार पाऊस झाल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे.

महाराष्ट्राच्या अनेक भागांत पुढच्या २४ तासांत मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून, ठाणे, कोकणातील शाळा आणि ज्युनिअर कॉलेजना गुरुवारी, ५ सप्टेंबरला सुटी जाहीर करण्यात आली आहे. शालेय शिक्षण मंत्री आशीष शेलार यांनी यासंबंधीचं ट्विट केलं आहे. आपापल्या भागातील पावसाचा अंदाज घेऊन, शाळांना सुटी देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.   

गेल्या २४ तासांत मुंबई, ठाणे, कोकण पट्ट्यात धुवाधार पाऊस झाला. त्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. मुंबई, ठाण्यात रस्ते आणि रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेल्यानं नागरिकांचे हाल झाले. वाहतुकीचे पार तीनतेरा वाजल्यानं नोकरदार अडकून पडले. मुंबईची, मुंबईकरांची काळजी घेण्यात प्रशासन अपयशी ठरल्याची टीका होत आहे. 

अडकलेल्या नोकरदारांसाठी बृहन्मुंबई महापालिकेकडून पालिकेच्या शाळांमध्ये तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अनेक स्वयंसेवी संस्था, गणेशोत्सव मंडळांनीही मदतीचा हात पुढे केला आहे. 

रेल्वे स्थानकाजवळील महापालिकेच्या शाळांची संक्षिप्त माहिती पुढीलप्रमाणे आहे:

१)छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक आठ व नऊच्या प्रवेश द्वारासमोर समोर आणि जीपीओच्या (मोठे पोस्ट ऑफिस) देखील समोर असणार्‍या मनमोहन दास मनपा शाळा

२) मशिद रेल्वेस्थानकाजवळ जेआर मनपा उर्दू शाळा

३) मरीन लाईन्स स्टेशन जवळ श्रीकांत पाटेकर मार्गावर चंदनवाडी मनपा शाळा

४) मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाजवळ गिल्डर लेन हिंदी मनपा शाळा

५) ग्रॅन्ट रोड रेल्वे स्थानकाजवळ जगन्नाथ शंकर शेठ मनपा शाळा

६) भायखळा स्थानकाजवळ सावित्रीबाई फुले मनपा हिंदी शाळा

७) मध्य रेल्वेच्या परळ रेल्वे स्थानकाजवळ व हाफकिन इन्स्टिट्यूटच्या बाजूला असणारी बारादेवी मनपा शाळा

८) लोअर परेल पश्चिम व करी रोड पश्चिम या दोन्ही रेल्वे स्थानकांजवळ ना.म. जोशी मार्गावरील नामजोशी मनपा शाळा आणि साळसेकरवाडी येथील मनपा शाळा

९) दादर पश्चिम परिसरात रेल्वेस्थानकाजवळ कबूतर खाना जवळ असणारी भवानी शंकर मनपा शाळा आणि पोर्तुगीज चर्च जवळ "गोखले रोड मनपा शाळा क्रमांक दोन"

१०) दादर पश्चिम व माटुंगा पश्चिम परिसरात यशवंतराव चव्हाण नाट्यगृह जवळ असणारी "दादर वूलन मिल मनपा शाळा"

११) माहीम स्टेशन जवळ सोनावाला अग्यारी लेन दत्तमंदिर मैदानाजवळ असणारी मोरी रोड मनपा शाळा

१२) वांद्रे पूर्व परिसरात खेरवाडी मनपा शाळा

१३) सांताक्रूझ पूर्व स्टेशन जवळ वाकोला मनपा हिंदी शाळा आणि कलिना मनपा हिंदी शाळा

१४) अंधेरी पश्चिम परिसरात टाटा कंपाउंड मनपा शाळा

१५) बोरिवली पश्चिम परिसरात प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात जवळ "सोडावला लेन मनपा शाळा"

१६) बोरिवली पूर्व परिसरात दत्तपाडा मनपा शाळा आणि कस्तुरबा क्रॉस लेन मनपा शाळा क्रमांक 2

१७) घाटकोपर पश्चिम परिसरात साई नगर मनपा मराठी शाळा क्रमांक 2, बरवे नगर मनपा शाळा, पंतनगर मनपा शाळा

१८) गोवंडी स्टेशन जवळ देवनार कॉलनी मनपा शाळा

टॅग्स :आशीष शेलारमुंबई मान्सून अपडेटशाळामहाविद्यालय