मुंबई - मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी पाणी साचलं असून रस्ते आणि रेल्वे वाहतुकीला फटका बसला आहे. पहाटेपासूनच पावसाची जोरदार बॅटींग पाहायला मिळत आहे. याचाच मोठा फटका मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेला बसला आहे. पावसामुळे रेल्वेसेवा ठप्प झाली आहे. अनेक ठिकाणी रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने लोकलचा खोळंबा झाला.
मस्जिद स्थानकावर पाणी साचल्यामुळे वडाळा रोड ते सीएसएमटी दरम्यान अप आणि डाउन हार्बर लाईन सेवा काही काळासाठी स्थगित करण्यात आली असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते भायखळा स्थानकादरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली आहे. पश्चिम रेल्वेची वाहतून १० ते १५ मिनिटं उशिराने सुरू आहे.
बदलापूर, अंबरनाथ, कल्याण या भागातून येणाऱ्या लोकल सेवा कुर्ला स्थानकापर्यंत आणल्या जात आहेत. गेल्या तासाभरापासून मध्य रेल्वेची सेवा ठप्प आहे. शहर आणि उपनगरात काही ठिकाणी तुरळक स्वरुपाचा तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. पुढील ३-४ तासांत जिल्ह्यांतील काही ठिकाणी ५०-६० किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांनी सतर्क राहावे अशा सूचना हवामान विभागाने दिल्या आहेत.
अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे दक्षिण मध्य महाराष्ट्र व लगतच्या मराठवाड्याच्या भागात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे पुढील चार दिवसांत कोकण, गोव्यातील बहुतांश भागात मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडेल, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात दोन ते तीन दिवस मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.