जुलै मान्सून जमके बरसणार !
By सचिन लुंगसे | Updated: July 2, 2024 20:00 IST2024-07-02T19:59:07+5:302024-07-02T20:00:00+5:30
Mumbai Rain Update: मुंबई शहर आणि उपनगरात अद्याप पावसाने म्हणावी तशी बॅटिंग सुरु केली नसली तरी राज्यात बहुतांशी ठिकाणी मान्सून धो धो कोसळत आहे. जुन महिन्यात पावसाने ब-यापैकी हजेरी लावली असतानाच आता जुलै महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा अधिक म्हणजे १०६ टक्के पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तविली आहे.

जुलै मान्सून जमके बरसणार !
मुंबई - मुंबई शहर आणि उपनगरात अद्याप पावसाने म्हणावी तशी बॅटिंग सुरु केली नसली तरी राज्यात बहुतांशी ठिकाणी मान्सून धो धो कोसळत आहे. जुन महिन्यात पावसाने ब-यापैकी हजेरी लावली असतानाच आता जुलै महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा अधिक म्हणजे १०६ टक्के पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तविली आहे.
महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात जुलै महिन्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता नाही. मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, उत्तर रत्नागिरी, नंदुरबार, नाशिक, धुळे, अहमदनगर, पुणे, सांगली, कोल्हापूर, पश्चिम सातारा, पूर्व सोलापूर, परभणी, धाराशिव, लातूर, नांदेड, बुलढाणा, अकोला, अमरावती वाशिम, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात जुलै महिन्यात त्या महिन्यातील सरासरीपेक्षा अधिक म्हणजे १०६ टक्के पावसाची शक्यता आहे, अशी माहिती हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.
मान्सूनने सोमवारी संपूर्ण देश व्यापला आहे. पुढील ३ दिवस कोकण, विदर्भात जोरदार तर मध्य महाराष्ट्रात मध्यम आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे. दक्षिण रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच सातारा व सोलापूर जिल्ह्याच्या काही भागात जुलै महिन्यात त्या महिन्यातील सरासरीपेक्षा अधिक म्हणजे १०६ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक पावसाची शक्यता खुपच अधिक आहे.
जळगाव, छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, बुलढाणा, यवतमाळ जिल्ह्यात व लगतच्या परिसरात जुलै महिन्यात त्या महिन्यातील सरासरीइतका म्हणजे ९६ ते १०४ टक्के इतका पाऊस पडेल. राज्यात दुपारी ३ दरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक असेल. दिवसाचे अधिक तापमान म्हणून अधिक आर्द्रता; त्यामुळे पावसाची शक्यताही सरासरीपेक्षा अधिक आहे.