Join us

Mumbai Rains: ढगांच्या गडगडाटासह कांदिवली, बोरिवली भागात मुसळधार पाऊस; चाकरमान्यांची तारांबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 09:53 IST

Mumbai Rain Alert मुंबईत आलेल्या अवकाळी पावसामुळे लोकल सेवेवर परिणाम झाला असून रेल्वेचे वेळापत्रक कोलमडलं आहे

मुंबई - ऐन मे महिन्यात मेघगर्जनेसह मुंबईच्या कांदिवली, बोरिवली भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाटासह कोसळणाऱ्या या पावसामुळे मुंबईकर चाकरमान्यांची तारांबळ उडाली आहे. सकाळी ९ पासून पाऊस कोसळत असून उन्हाळ्यात लोकांना छत्री, रेनकोटचा आधार घ्यावा लागत आहे. हवामानात झालेल्या बदलामुळे मंगळवारी रात्री मुंबईत पावसाने हजेरी लावली होती. पश्चिम उपनगरातील बोरिवली, कांदिवली, गोरेगाव, दहिसर, पवई, जोगेश्वरीत तुरळक पाऊस पडला होता. 

मुंबईत आलेल्या अवकाळी पावसामुळे लोकल सेवेवर परिणाम झाला असून रेल्वेचे वेळापत्रक कोलमडलं आहे. मंगळवारी रात्री जोरदार वाऱ्यामुळे काही ठिकाणी तांत्रिक बिघाड झाला होता. पुढील २४ तासांत मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, नाशिक जिल्ह्याच्या काही भागांत जोरदार वारे वाहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मे महिन्यात पडलेल्या या पावसामुळे उकाड्याने त्रस्त नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र अचानक आलेल्या पावसामुळे चाकरमान्यांची तारांबळ उडाली. 

राज्यात मागील ३ दिवसांपासून पावसाची हजेरी असून काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. एप्रिल महिन्यात उष्णतेच्या लाटेचा कहर दिसून आला. अनेक शहरातील तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले होते. त्यात मे महिन्याच्या सुरुवातीलाच अवकाळी पाऊस आणि गारपीट होत आहे. IMD ने दिलेल्या माहितीनुसार, गुजरात लगतच्या अरबी समुद्रात वाऱ्यांची चक्रीय परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे हवामान विभागाने पुढील दोन दिवस महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा अलर्ट जारी केला आहे. 

हवामान खात्याचा इशारा

येत्या २४ तासांमध्ये राज्याच्या कोकण भागापासून मराठवाडा आणि विदर्भासह उत्तर महाराष्ट्रालाही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात वादळाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मुंबईत देखील ६ ते ८ मे दरम्यान अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला होता. शहरातील बहुतांश भागांमध्ये दिवसा ढगाळ वातावरण आणि संध्याकाळी सोसाट्याचा वारा सुटून पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज वर्तवला आहे. 

टॅग्स :मुंबई मान्सून अपडेटपाऊस