गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या अतिमुसळधार पावसामुळे मुंबईच्या अक्षरशः नाकातोंडात पाणी गेलं आहे. रस्त्यांचे कालवे झाले आहे, तर रेल्वे रुळही पाणी भरल्यामुळे दिसेनासे झाले आहेत. त्यातच मिठी नदीनेही मुंबईकरांची चिंता वाढवली. मिठी नदीला पूर आला असून, त्यात एक तरुण वाहून गेल्याची घटना घडली. या तरुणाला नंतर वाचवण्यात यश आल्याची माहिती मिळाली आहे.
मिठीत नदीत तरुण वाहून जातानाची सगळी घटना काहींनी मोबाईलमध्ये शूट केली आहे. हा तरुण मिठी नदीच्या काठावरून जात होता. त्याचवेळी पाय घसरून तो पडला. त्यानंतर त्याला वाचवण्यासाठी दोरी सोडण्यात आली, पण अंदाज चुकला आणि तो वाहून गेला.
ही घटना पवईतील फुलेनगर भागातील फिल्टर पाडा येथे घडली आहे. मिठी नदीच्या पाण्याचा प्रवाह खूप वेगात होता. हा तरुण नदीच्या काठावरून जात होता. त्याचा पाय घसरला आणि तोल जाऊन तो खाली पडला. नदीच्या दोन्ही बाजूने सिमेंटचे कठडे करण्यात आले आहे. त्या कठड्याचा गज तरुणाच्या हाताला लागला.
दोरी सोडली पण, पकडताना अंदाज चुकला...
पाण्याचा वेग प्रचंड होता. तरुण त्या गजाला धरून होता. त्यावेळी काही जणांनी खाली दोरी सोडली. त्याच्या पाठीमागच्या बाजूने दोरी टाकण्यात आली. ती पकडत असताना त्याने एका हाताने गज धरून ठेवला होता. पण, दुसऱ्या हाताने दोरी पकडताना अंदाज चुकला. दोरी हातात आलीच नाही आणि गजावरील पकड सैल होऊन तो वाहून गेला. पुढे काही अंतरावर नागरिकांना त्याला वाचवण्यात यश आले.
मिठी नदी मंगळवारी सकाळी धोक्याच्या पातळीवरून वाहू लागल्याने मुंबई महापालिका प्रशासनाने मिठी नदीच्या पात्राजवळ जाणे टाळावे असे आवाहन केले होते. तरीही हा तरुण नदीकडे गेला आणि ही घटना घडली अशी माहिती आहे.