मुंबई, पुणे, नाशिक बनले गॅस चेंबर!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 06:51 AM2019-01-22T06:51:03+5:302019-01-22T06:55:27+5:30

महानगरी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद आणि चंद्रपूरसह राज्यातील बहुतांश शहरांचा श्वास गुदमरला आहे.

Mumbai, Pune, gas chamber made of Nashik! | मुंबई, पुणे, नाशिक बनले गॅस चेंबर!

मुंबई, पुणे, नाशिक बनले गॅस चेंबर!

Next

- सचिन लुंगसे
मुंबई : वाहनांचे वाढते प्रदूषण, सूक्ष्म धुलीकणांचे प्रचंड प्रमाण, बांधकाम प्रकल्प व रस्त्यांमुळे वातावरणात वाढणारे सिमेंटचे कण, औद्योगिक पट्ट्यातून सोडला जाणारा घातक वायू आदींमुळे महानगरी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद आणि चंद्रपूरसह राज्यातील बहुतांश शहरांचा श्वास गुदमरला आहे. त्यामुळे श्वसनाशी संबंधित आजार, विविध अ‍ॅलर्जीच्या प्रमाणात वाढ होत आहे.
‘सफर’, ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’, ‘केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ’ आणि ‘टेरी’ या संस्थांकडून देशभरातील प्रदूषणाची पातळी मोजली जाते. त्यांच्या नोंदींच्या अभ्यासात मुंबई, नवी मुंबई, बदलापूर, पुणे, नाशिक, जळगाव, औरंगाबाद, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, जालना, नागपूर, अमरावती, अकोला, चंद्रपूर, लातूर या शहरांमध्ये सर्वाधिक वायू प्रदूषणाची नोंद होत आहे. सर्वसामान्य मानकांपेक्षा हे प्रमाण अधिक आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी तीन वर्षांचा आराखडाही केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने तयार केला आहे.
महाराष्ट्रानंतर उत्तर प्रदेशात सर्वाधिक वायू प्रदूषणाची नोंद होत असून, त्याखालोखाल पंजाब, हिमाचल प्रदेश, गुजरात, तमिळनाडू, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील शहरांमध्ये वायू प्रदूषणाचे प्रमाण अधिक आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी दिल्ली सरकारकडून ज्या प्रमाणे प्रदूषणकारी कारखान्यांवर कारवाईसह वाहनांच्या प्रवेशावर निर्बंधांचे प्रयोग राबविले जात आहेत; त्याप्रमाणे इतर राज्यांतील शहरांनी प्रदूषण कमी करण्यासाठी कोणतेही नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले नसल्याचेही या अहवालांत नोंदवण्यात आले आहे.
मुंबई महापालिकेने धूलीकणांचे प्रमाण कमी करण्यासाठी देशी झाडे लावण्याचा उपक्रम ‘पर्यावरण दिनी’ हाती घेतला. मात्र प्रदूषणाच्या प्रमाणात हे उपाय तोकडे पडल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.
टेरीच्या सर्वेक्षणानुसार बंगळुरु, चेन्नई, दिल्ली, कानपूर, मुंबई आणि पुण्यातील रस्त्यावरील धूळ, बांधकाम प्रकल्प आणि मातीची धूप यामुळे हवेचे प्रदूषण वाढते. सूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण ६ ते ५८ टक्क्यांपर्यंत आहे. वाहनांच्या धुरामुळे नायट्रोजन, सल्फर, कार्बन हे वायू हवेत मिसळतात.
>कार्बनचे प्रमाण अधिक
सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये कार्बन डायआॅक्साइड, नायट्रोजन आॅक्साइड, सूक्ष्म धूलिकण अतिसूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने निश्चित केलेल्या मानकांपेक्षा अधिक आहेत.
>तीन वर्षांचा आराखडा
देशासह महाराष्ट्रातील वायू प्रदूषण रोखण्यासाठी केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालयाने ‘नॅशनल क्लिन एअर प्रोग्रॅम’ जाहीर केला. त्या अंतर्गत पहिल्या टप्प्यात देशातील सर्वाधिक प्रदूषित १०६ शहरांची यादी तयार करण्यात आली. केंद्रीय पर्यावरण मंत्री हर्षवर्धन यांनी सहा महिन्यांपूर्वी सर्वाधिक प्रदूषित शहरांकडून हवेच्या प्रदूषण नियंत्रणाचा आराखडाही मागवला होता. त्याच्या आढाव्यातून तयार केलेल्या कृती आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी १०२ शहरांची निवड करण्यात आली आहे. त्या महाराष्ट्रातील १७ शहरांचा समावेश आहे. राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सहभागातून ही योजना राबविण्यात येणार आहे. ‘नॅशनल क्लिन एअर प्रोग्रॅम’ अंतर्गत तीन वर्षांत या शहरांतील प्रदूषण ३५ टक्क्यांनी कमी करण्यावर भर देणार आहे.
>मुंबई- नवी
मुंबईची स्थिती
बोरीवली- ३४२
मालाड- २४७
अंधेरी - ३३७
बीकेसी- ३३३
चेंबूर - २१२
च्नवी मुंबई - ३२६
(हवेची गुणवत्ता, प्रमाण : पार्टिक्युलेट मॅटरमध्ये, स्त्रोत : सफर)

वाहनांची देखभाल करा
वाहनांची देखभाल केल्यास प्रदूषण कमी होईल. उच्च दर्जाची वीज उपकरणे वापरायला हवी. परिणामी, विजेचा कमी वापर होईल. त्यातून वीज निर्मितीतील कोळशाचा वापर कमी होईल. झाडांचे प्रमाण वाढवून धूळ कमी करता येईल. - सुमित शर्मा, सहसंचालक, टेरी
>हवेच्या गुणवत्तेचे निकष
पातळी दर्जा
०-१०० योग्य
१०१-२०० सामान्य
२०१-३०० धोकादायक
३०१-४०० अतीधोकादायक
४०० पेक्षा+ घातक
(आकडेवारी : पार्टिक्युलेट मॅटरमध्ये)

Web Title: Mumbai, Pune, gas chamber made of Nashik!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.