मुंबईच्या पवई परिसरात गुरुवारी एक धक्कादायक घटना घडली, ज्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. पवईच्या आरए स्टुडिओमध्ये काही मुलांना शूटिंगसाठी बोलवून त्यांना ओलीस ठेवण्यात आले. मुंबई पोलिसांनी तत्काळ बचाव कार्य सुरू करत या मुलांची सुटका केली. हे ऑपरेशन सुरू असताना, रोहित आर्याने पोलिसांवर गोळीबार केला.याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनीही रोहित आर्यावर गोळी चालवली, याचा त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून ओलीस ठेवलेल्या मुलांच्या पालकांनी हा संपूर्ण घटनाक्रम कथित केला आणि त्यावेळी नेमके काय घडले? याची माहिती दिली.
ओलीस ठेवलेल्या एका मुलाच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार,"आरोपी रोहित आर्याने अत्यंत पद्धतशीरपणे मुलांना आपल्या जाळ्यात ओढले. मुलांचे ऑडिशन मोबाईलवर घेण्यात आले आणि त्यांना लवकरच शूटिंग सुरू होईल असे सांगण्यात आले. त्यानंतर सर्व मुलांना एका खोलीत नेऊन त्यांच्या पालकांना बाहेर जाण्यास सांगितले. थोड्या वेळानंतर तिथे खूप शांतता पसरली. पालकांना वाटले की, स्टुडिओमध्ये कामासाठी आवश्यक शांतता राखली जात आहे. मात्र, बराच वेळ झाला तरी खोली न उघडल्याने पालकांना वेगळाच संशय आला. मुलांना खोलीत कोंडून ठेवल्यानंतर रोहित आर्याने आपला खरा हेतू उघड केला. आरोपीने मुलांना त्यांच्या पालकांशी फोनवर बोलायला लावले आणि त्याला त्याचे २ कोटी रुपये हवे आहेत असे सांगितले."
आरोपी रोहित आर्याने मुलांनाच ढाल बनवून त्यांच्या पालकांवर दबाव आणायला सुरुवात केली. मुलांच्या जीवाच्या भीतीपोटी पालकांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधला. रोहित आर्याने एका शासकीय अभियानाचे पैसे थकल्याचा दावा केला आणि अनेक दिवसांपासून सरकारकडे थकीत २ कोटी रुपयांची मागणी केली, अशी माहिती पोलीस तपासातून समोर आली.
आपल्या थकलेल्या पैशांसाठी त्याने लहान मुलांना ओलीस ठेवण्याचा टोकाचा मार्ग अवलंबला. मुंबई पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत अत्यंत कौशल्याने परिस्थिती हाताळली आणि १७ निष्पाप मुलांची सुरक्षित सुटका केली. मात्र, या घटनेमुळे फिल्म इंडस्ट्रीतील ऑडिशनच्या प्रक्रियेवर आणि पालकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
Web Summary : Mumbai police rescued children held hostage at a studio by Rohit Arya, who demanded money. Arya was killed in the operation. Parents recounted the ordeal, revealing auditions were a ruse to extort money.
Web Summary : मुंबई पुलिस ने रोहित आर्य द्वारा स्टूडियो में बंधक बनाए गए बच्चों को छुड़ाया। आर्य की कार्रवाई में मौत हो गई। माता-पिता ने बताया कि ऑडिशन एक दिखावा था, जिसका उद्देश्य पैसे वसूलना था।