मुलगा CA, भाऊ, बहीण परदेशात; तरीही करायचा चोरी! एका चुकीमुळे हायप्रोफाईल चोरटा जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 13:06 IST2026-02-07T13:05:33+5:302026-02-07T13:06:48+5:30
तब्बल २३ चोऱ्या करणाऱ्या चोरट्याला मुंबई पोलिसांनी अखेर अटक केली आहे.

मुलगा CA, भाऊ, बहीण परदेशात; तरीही करायचा चोरी! एका चुकीमुळे हायप्रोफाईल चोरटा जाळ्यात
Mumbai Crime: घरची परिस्थिती अत्यंत श्रीमंत, मुले उच्चशिक्षित आणि स्वतःचा चांगला चालणारा व्यवसाय... अशा पार्श्वभूमीचा कोणताही व्यक्ती गुन्हेगारीकडे वळेल असा विचारही कुणी करणार नाही. मात्र, मुंबई पोलिसांनी अशा एका चोराला अटक केली आहे, ज्याचे संपूर्ण कुटुंब हायप्रोफाईल आहे, पण केवळ एका वाईट व्यसनामुळे तो गजाआड पोहोचला. ४९ वर्षीय मोहन कोकाटे असे या अट्टल सोनसाखळी चोराचे नाव असून, त्याच्या अटकेची कहाणी एखाद्या चित्रपटासारखी रंजक आहे.
जुगाराचे व्यसन आणि कुटुंबाची साथ सुटली
पोलीस तपासात समोर आलेली माहिती थक्क करणारी आहे. मोहन कोकाटे याचे कुटुंब अत्यंत सुशिक्षित आहे. त्याची बहीण दुबईत असते, तर भाऊ अमेरिकेत स्थायिक आहे. त्याचा एक मुलगा चार्टर्ड अकाउंटंट आहे आणि दुसरा इंजिनीअर आहे. मोहन स्वतः वडिलांसोबत गार्डनिंगचा मोठा व्यवसाय करायचा. मात्र, त्याला ऑनलाइन कॅसिनो आणि जुगाराचे भयंकर व्यसन जडले. या नादात तो कर्जात बुडाला आणि झटपट पैसे कमावण्यासाठी त्याने पुन्हा चोरीचा मार्ग निवडला. २०११ मध्येही तो जेलमध्ये गेला होता, पण पुन्हा सुधरण्याचे आश्वासन देऊन तो बाहेर आला होता.
८० सीसीटीव्ही आणि 'त्या' बुटांनी सापडला
मोहन अत्यंत चलाखीने चोरी करायचा. तो चोरीची बाईक वापरायचा आणि ओळख पटू नये म्हणून हेल्मेट आणि कपडे वारंवार बदलायचा. मात्र, तो त्याचे बूट बदलण्यास विसरला. सायन परिसरात २५ जानेवारीला त्याने एका महिलेचे मंगळसूत्र लांबवले. ते मंगळसूत्र बनावट होते, तरीही पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. पोलिसांनी परिसरातील सुमारे ८० सीसीटीव्ही फुटेज तपासले. प्रत्येक फुटेजमध्ये आरोपीचे कपडे वेगळे होते, पण त्याच्या पायातील बूट मात्र एकसारखेच होते. याच बुटांच्या खुणेवरून पोलिसांनी त्याचा माग काढला आणि ठाण्याच्या तीन हात नाका परिसरातून त्याला बेड्या ठोकल्या.
चोरीची मोडस ऑपेरंडी
मोहनने गुन्ह्यासाठी नेरुळमधून एक दुचाकी चोरली होती. तो मुंबई किंवा नवी मुंबईत चेन स्नॅचिंग करायचा आणि त्यानंतर ती बाईक ठाण्याच्या तीन हात नाक्यावर उभी करून स्वतःच्या घरी पायी निघून जायचा, जेणेकरून पोलिसांना संशय येऊ नये. चोरी केल्यानंतर तो दोन-तीन दिवस त्या बाईकच्या जवळही फिरकायचा नाही.
पोलिसांची कारवाई
शीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनंत साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे संजय जगताप, अतुल ठोंबरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. मोहनच्या नावावर मुंबईत २३ हून अधिक गुन्हे असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्याच्याकडून १ लाख २० हजार रुपयांचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.