Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 16:51 IST2025-11-08T16:50:37+5:302025-11-08T16:51:31+5:30
Mumbai Police Summons Manoj Jarange Patil: मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांना मुंबई पोलिसांनी समन्स बजावले आहे.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबई पोलिसांनी जरांगे-पाटील आणि त्यांच्यासह इतर पाच जणांना आझाद मैदान पोलीस ठाण्यात तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे समन्स बजावले आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्यावर आझाद मैदानावरील उपोषणदरम्यान नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे.
#BREAKING Mumbai Police has issued summons to Maratha activist Manoj Jarange-Patil and five others to appear before the investigating officer at Azad Maidan Police Station on November 10 between 11 am and 1 pm. The summons relate to violations during Jarange-Patil’s hunger strike… pic.twitter.com/Ha0a9wALbo
— IANS (@ians_india) November 8, 2025
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे समन्स जरांगे पाटील यांनी आझाद मैदानात केलेल्या उपोषणादरम्यान झालेल्या कथित उल्लंघनांशी संबंधित आहेत. जरांगे-पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर आझाद मैदानावरील आंदोलनादरम्यान पोलिसांनी घालून दिलेल्या नियम आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. समन्समध्ये मनोज जरांगे-पाटील आणि इतर पाच जणांना १० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेच्या दरम्यान आझाद मैदान पोलिस स्टेशनमधील तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले.
पोलिसांच्या या कारवाईमुळे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे आणि जरांगे-पाटील यांच्या पुढील राजकीय वाटचालीचे कायदेशीर आव्हान वाढले आहे. या समन्सवर जरांगे-पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांची पुढील भूमिका काय असेल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.