तिने भेटायला बोलवलं अन् तरुण अडकला मोठ्या संकटात; मुंबईत डेटिंग अॅपद्वारे लुटणाऱ्या २१ जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 16:33 IST2025-07-07T16:29:11+5:302025-07-07T16:33:42+5:30

मुंबईत डेटिंग ॲपच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या २१ जणांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

Mumbai Police have arrested 21 people for cheating through a dating app in Mumbai | तिने भेटायला बोलवलं अन् तरुण अडकला मोठ्या संकटात; मुंबईत डेटिंग अॅपद्वारे लुटणाऱ्या २१ जणांना अटक

तिने भेटायला बोलवलं अन् तरुण अडकला मोठ्या संकटात; मुंबईत डेटिंग अॅपद्वारे लुटणाऱ्या २१ जणांना अटक

Mumbai Dating App Scam: डेटिंग ॲपच्या माध्यमातून लूटमारीच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. डेटिंग ॲपवर तरुणींची प्रोफाइल तयार करुन तरुणांना फसवलं जात असल्याचे अनेक प्रकरणांमध्ये समोर आलं आहे. या डेटिंग ॲपच्या नादाला लागून अनेकांनी आपली आयुष्यभराची कमाई घालवली आहे. अशातच मुंबईतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबईत डेटिंग अ‍ॅपद्वारे फसवणूक करणाऱ्या अख्ख्या टोळीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. ही टोळी ॲपच्या माध्यमातून तरुणांना फसवत होती.

 मुंबईत एका मोठ्या डेटिंग अ‍ॅप घोटाळ्याचा खुलासा झाला आहे. डेटिंग अ‍ॅपद्वारे लोकांना फसवणाऱ्या आणि लुबाडणाऱ्या टोळीतील २१ जणांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या पाच दिवसांपासून ही कारवाई सुरु होती आणि सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये १५ मुले आणि ६ मुलींचा समावेश आहे. या टोळीतील मुली डेटिंग अ‍ॅप्सवर बनावट प्रोफाइल तयार करून मुलांशी बोलत असत. त्यानंतर त्यांना डेटवर बोलवत. जिथे जिथे डेट प्लॅन केली जायची तिथे या टोळीतील काही सदस्य वेटर म्हणून काम करायचे आणि जास्तीचे बनावट बिल बनवून मुलांकडून पैसे उकळायचे. पोलीस सध्या या टोळीच्या फसवणुकीला बळी पडलेल्या तरुणांचा शोध घेत आहे.

मुंबईतील अंधेरीतील एका २६ वर्षीय तरुणाची दिशा शर्मा नावाच्या मुलीशी डेटिंग अॅपवर ओळख झाली आणि त्यांच्यात चॅटिंग सुरू झाले. सुरुवातीच्या चॅटिंगनंतर दोघांनी भेटण्याचा प्लॅन केला. दोघेही बोरिवलीतील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले. जेवणानंतर वेटर ३५,००० रुपयांचे बिल घेऊन आला. इतके मोठ बिल पाहून मुलाला संशय आला. त्याने पोलिसांना फोन केला, त्यानंतर बिल ३०,००० रुपये करण्यात आले. त्यानंतर दिशा शर्मा नावाच्या तरुणीने मी अर्धे बिल देते असं सांगितले. तक्रारदाराने वेटरने दिलेला क्यूआर कोड स्कॅन करून १५,००० रुपये ट्रान्सफर केले. घरी गेल्यानंतर तक्रारदाराने पुन्हा तपासणी केली तेव्हा त्याला कळलं की पैसे हॉटेलच्या नाही तर मोहम्मद तालिब नावाच्या व्यक्तीच्या खात्यात ट्रान्सफर केले होते. त्याने लगेच पोलिसांकडे तक्रार केली.

पोलिसांनी दिशा शर्माच्या मोबाईल नंबर वरुन तिचा शोध घेतला आणि ३ जुलै रोजी नवी मुंबईतील दिघा येथून तिला अटक केली. चौकशीदरम्यान तिने सांगितले की ती एका टोळीची सदस्य आहे. या टोळीचे सदस्य डेटिंग अॅप्सच्या मदतीने लोकांना भेटून त्यांना डेटवर घेऊन जातात आणि हॉटेल कर्मचाऱ्यांच्या मदतीने बनावट बिले बनवून त्यांची फसवणूक करतात. "या टोळीतील मुली डेटिंग अॅप्सवर बनावट प्रोफाइल तयार करून मुलांशी मैत्री करायच्या. त्या मुलांना वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये बोलावायच्या, त्यांच्यासोबत जेवायच्या आणि नंतर बनावट बिले दाखवून त्यांची फसवणूक करायच्या," असं पोलिसांनी सांगितले.
 

Web Title: Mumbai Police have arrested 21 people for cheating through a dating app in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.