Join us
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला आझाद मैदानात परवानगी नाकारली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2024 14:31 IST

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील २६ जानेवारीपासून मुंबई आंदोलन करणार आहे.

मराठा आरक्षणासाठी गेल्या काही दिवसापासून आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे पाटील २६ जानेवारीपासून मुंबईत आंदोलनाला बसणार आहेत. लाखो मराठा आंदोलकांसह मनोज जरांगे पाटील लोणावळ्यापर्यंत आले आहेत. दरम्यान, आता मुंबई पोलिसांनी जरांगे पाटील यांना नोटीस बजावली आहे. मुंबई पोलिसांनी आझाद मैदानात परवानगी नाकारली आहे.  काल हायकोर्टात या आंदोलनाबाबत एक सुनावणी झाली या सुनावणीत हायकोर्टाने मुंबई पोलिसांना याबाबत आदेश दिले होते. 

मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात आंदोलक येणार आहेत. आझाद मैदानावर एवढी मोठी क्षमता नाही तर बाकीच्या मैदानावर अन्य नियोजित कार्यक्रम आहेत, त्यामुळे मुंबईत या मोर्चाला परवानगी दिलेली नाही, असंही मुंबई पोलिसांनी सांगितले आहे. यामुळे हा मोर्चा मुंबईत न येता खारघर येथील मैदानावर सुरू ठेवावे. तसेच याच्या परवानगी संबंधीत कार्यालयातून घ्याव्यात, असं या नोटीसमध्ये कळवण्यात आले आहे. काल हायकोर्टाने याबाबत सूचना दिल्या होत्या. 

मनोज जरांगे पाटील लोणावळ्यात मुक्काम स्थळी दाखल

मनोज जरांगे पाटील यांचा चौथा मुक्काम व सभा लोणावळा शहराच्या जवळ असलेल्या वाकसई चाळ येथे बुधवारी रात्री 8.30 वाजता होणार होता. मात्र वाघोली ते लोणावळा असा प्रवास करताना मनोज जरांगे पाटील यांना तब्बल 10 तासाहून अधिक वेळ लागल्याने त्यांना मुक्काम व सभा स्थळी पोहचण्यासाठी सकाळचे 6.45 वाजले. सकाळी 6 वाजता जरांगे पाटील मावळच्या भूमीत दाखल झाले. त्यानंतर त्यांची सभा होणार आहे. 

मात्र सकल मराठा समाज मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना पाहण्यासाठी व त्यांचे विचार ऐकण्यासाठी रात्रभर सभास्थळी शेकोट्या पेटवून बसला होता. याविषयी पहाटे चार वाजता त्यांच्याशी संवाद साधला असता आमच्या मुला बाळांना आरक्षणाचा हक्क मिळावा म्हणून आमचा मनोज दादा रात्रंदिवस जागा असताना आम्हाला झोप कशी येणार अशी बोलकी प्रतिक्रिया त्यांनी दिली. वाघोली येथून काल सकाळी निघालेले मनोज जरांगे पाटील आजून जागे आहेत. लाखोंच्या संख्येने मराठा समाज बांधव त्यांच्या स्वागतासाठी जागोजागी थांबले आहेत. 

टॅग्स :मनोज जरांगे-पाटीलमराठा आरक्षणन्यायालयपोलिस