सायबर गुन्हे रोखण्यास मुंबई पोलिस सक्षम; देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 06:37 IST2025-04-08T06:37:18+5:302025-04-08T06:37:31+5:30
मुंबई पोलिसांच्या विविध उपक्रमांचे लोकार्पण आझाद मैदान पोलिस ठाण्यातील उत्कर्ष सभागृहात सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.

सायबर गुन्हे रोखण्यास मुंबई पोलिस सक्षम; देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
लोकमत न्यूज नेटवर्क , मुंबई : सायबर गुन्हेगारी हे भविष्यातील आव्हान आहे. ही गुन्हेगारी रोखण्यासाठी मुंबईचे पोलिस दल सक्षम आहे. सर्व पोलिस ठाण्यांत महिला तसेच नागरिककेंद्री सोयीसुविधा उभारण्यात आल्या आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.
मुंबई पोलिसांच्या विविध उपक्रमांचे लोकार्पण आझाद मैदान पोलिस ठाण्यातील उत्कर्ष सभागृहात सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला गृह राज्यमंत्री योगेश कदम, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव इक्बालसिंह चहल, मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलिस आयुक्त देवेन भारती यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पोलिसांच्या नवीन मोटर सायकल, इंटरसेप्टर व्हेइकल्स, फॉरेन्सिक लॅब व्हॅन, निर्भया पथकाच्या व्हॅन यांना हिरवा झेंडा दाखविण्यात आला.
मिशन कर्मयोगी
उत्कर्ष सभागृह, पार्क साइट पोलिस स्टेशनची नूतन इमारत यांचेही लोकार्पण यावेळी करण्यात आले. तसेच मुंबईतील ८७ पोलिस ठाण्यांतील महिला व बाल सहाय्यता कक्ष, २१६ पोलिस ठाणे व उपायुक्त कार्यालयांमध्ये उभारण्यात आलेली दूरदृश्य प्रणाली यंत्रणा, पोलिस विभागाचे एक्स हॅन्डल यांचे लोकार्पण, मिशन कर्मयोगी माहिती पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले. पोलिस प्रशिक्षणाचा उद्घाटन सोहळाही यावेळी झाला.
सायबर गुन्हे रोखण्यासाठी अत्याधुनिक तीन सायबर लॅब उभारण्यात आले आहेत. डिजिटल अरेस्टसारख्या प्रकरणांमध्ये सुशिक्षीत लोकही पैसे गमावत आहेत. त्यासाठी जनजागृती महत्त्वाची आहे. त्यासाठीही मुंबई पोलिस विविध उपक्रम राबवत आहेत. महिलांविषयीचे गुन्हे रोखण्यासाठी आणि महिलांना पोलिसांविषयी विश्वास वाटावा, यासाठी पोलिस ठाण्यांत महिला व बाल सहाय्यता कक्ष निर्माण करण्यात आला आहे.
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री