मुंबई पोलिसांकडून मोठं ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त; ५२ कोटींच्या कोकेन प्रकरणात ब्रिटीश व्यक्तीसह ७ जण अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 10:03 IST2025-06-12T09:57:07+5:302025-06-12T10:03:49+5:30
मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने ५२ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात सात जणांना अटक केली आहे.

मुंबई पोलिसांकडून मोठं ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त; ५२ कोटींच्या कोकेन प्रकरणात ब्रिटीश व्यक्तीसह ७ जण अटकेत
Mumbai Drugs Cartel: मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने एक आंतरराष्ट्रीय ड्रग्ज कार्टेल समोर आणत सात जणांना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ५.०२ किलो कोकेन जप्त केले आहे. या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत ५२ कोटी रुपये असल्याचे समोर आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्यांमध्ये एक ब्रिटिश नागरिकाचा समावेश आहे. तो या रॅकेटचा प्रमुख असून त्याने मोझांबिक मार्गे भारतात ड्रग्जची तस्करी केली होती. अटकेत असलेल्यांमध्ये ब्रिटिश नागरिकासह बांगलादेशींचाही यामध्ये समावेश आहे.
"गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत, आमच्या पथकाने २८ मे रोजी लंडनमधील केन्सिंग्टन येथील दे वेरे गार्डन्स येथे राहणाल कुलदीप सिंग हरजीत सिंग गोजारा (५०) याला अटक केली होती. तो ट्रॉली बॅग घेऊन जात होता आणि जेव्हा त्याची तपासणी केली तेव्हा आमच्या पथकाला त्यात ५.०२ किलो कोकेन आढळले, ज्याची किंमत सुमारे ५२ कोटी रुपये आहे," असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
गोजाराला जोगेश्वरी पूर्व येथून ताब्यात घेण्यात आले जिथे तो ड्रग्जचे कंसाईनमेंट पोहोचवण्यासाठी आला होता. तो मूळचा पंजाबचा असून लंडनमध्ये स्थायिक झाला आहे अशी माहिती पोलिसांनी दिली. गोजाराला अटक केल्यानंतर त्याच्याशी संबंधित लोकांचा शोध घेण्यासाठी अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या वरळी युनिटने चौकशी सुरू केली होती. गोजराकडे केलेल्या चौकशीनंतर अंमली पदार्थ विरोधी पथकाने शेख मोहम्मद आरिफ उद्दिन याला अटक केली. शेख मोहम्मद पूर्व आफ्रिकेतील मोझांबिकमध्ये राहतो आणि तो बांगलादेशी नागरिक आहे.
"आम्ही दीव बेटावरील महेंद्र प्रेजीलाही अटक केली. यांच्यासह आमच्या पथकाने अब्दुल समद अफझल मेमन, परवेझ अफाक आणि ऋषभ एद्रिस यांनाही अटक केली, असं पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी त्यांच्याकडून हवाला पेमेंटशी संबंधित विविध कोड देखील जप्त केले आहेत ज्यांचा तपास सुरू आहे. "तपासात समोर आलं की, आरोपींनी मोझांबिक आणि दुबईला अनेक वेळा भेट दिली. आमची चौकशी प्राथमिक टप्प्यात आहे आणि जप्त केलेल्या ड्रग्जची किंमत सुमारे ₹५२ कोटी आहे," अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
दरम्यान, चार महिन्यांत मुंबई पोलिसांनी ७१० किलोग्राम गांजा जप्त केला आहे. तसेच मुंबईतील ४२६ ड्रग्ज प्रकरणांमध्ये सहभागी असलेल्या ४९३ जणांना अटक केली. जप्त केलेल्या गांजाची एकूण किंमत तब्बल ३६.७४ कोटी रुपये आहे. आकडेवारीनुसार आतापर्यंत शहरात सर्वाधिक गांजा जप्त करण्यात आला आहे. या वर्षी पोलिसांनी ६८६ किलोग्राम गांजा जप्त करण्यात यश मिळवले आहे, असे आकडेवारीतून समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, जानेवारी ते एप्रिल या कालावधीत पोलिसांनी हेरॉइन जप्तीशी संबंधित २१ गुन्हे दाखल करत २७ जणांना अटक केली. तर पोलिसांनी चरसशी संबंधित नऊ गुन्हे दाखल करत १४ जणांना अटक केली.