२० हजारांची नाणी देतो म्हणत हाती दिला कचरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 13:47 IST2025-10-26T13:45:52+5:302025-10-26T13:47:02+5:30
याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी अज्ञातावर गुन्हा नोंदविला आहे.

२० हजारांची नाणी देतो म्हणत हाती दिला कचरा
मुंबई : मुंबई महापालिकेचा कर्मचारी असल्याचे सांगून एका भामट्याने वांद्रे परिसरातील पंजाब स्वीट हाऊस या मिठाईच्या दुकानातील सेल्समनची २० हजार रुपयांची फसवणूक केली. आरोपीने १० रुपयांची नाणी बदल्याचा बहाणा केला होता. ही घटना २३ ऑक्टोबर रोजी घडली असून, वांद्रे पोलिसांनी अज्ञातावर गुन्हा नोंदविला आहे.
राकेशकुमार मदेशिया (वय ४०) याच्या तक्रारीनुसार, २३ ऑक्टोबर रोजी दुपारी राकेशकुमार व त्यांचा सहकारी श्याम बिहारी हे दुकानात काम करत असताना एक अनोळखी व्यक्ती त्यांच्याजवळ आला. त्याने स्वतःला महापालिकेचा कर्मचारी असल्याचे सांगून, त्याला पगारात १० रुपयांच्या नाण्यांच्या स्वरूपात २० हजार रुपये मिळाले आहेत. १० रुपयांची नाणी घेऊन त्या बदल्यात ५०० रुपयांच्या नोटा देण्याची विनंती त्याने केली. दुकानात सुट्ट्या पैशांची गरज असल्याने श्याम बिहारीने त्वरित मालकाला सांगितले आणि त्यांच्या संमतीने व्यवहार केला. त्यानंतर त्या व्यक्तीने मोबाइल क्रमांक देऊन वांद्रे येथे माणूस पाठवा, तो कॉइन देईल, असे सांगितले. त्यानुसार मदेशिया हे वांद्रे पश्चिमेतील हिल रोडवरील बँक ऑफ इंडियाजवळ गेले.
अशा प्रकारे भामट्याने केली बनवाबनवी
बँकेजवळ पोहोचल्यावर भामट्याने मदेशियाकडून २० हजार घेतले आणि सुरक्षारक्षकाकडे इशारा करत तो तुम्हाला कॉइन देईल, असे सांगितले. सुरक्षारक्षकाला सांगितले की, या व्यक्तीकडे द्या, असे सांगून भामटा तेथून पळाला.
मदेशिया सुरक्षारक्षकाजवळ गेला असता, त्याने बँकेतील कचऱ्याचा बॉक्स त्याच्याकडे दिला. मदेशिया याने कचरा नाही... पैसे घेण्यासाठी आल्याचे याने सांगितले. त्यावेळी सुरक्षारक्षकाने सांगितले की, इशारा केलेली व्यक्ती पालिकेचा कर्मचारी असून, त्यानेच कचरा देण्यास सांगितले. यावरून फसवणूक झाल्याचे मदेशियाच्या लक्षात आले.