Join us

मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 17:10 IST

Mumbai Hostage Situation Rohit Arya: मुंबई पोलिसांनी या सुटकेच्या थराराचा घटनाक्रम सांगितला.

Mumbai Hostage Situation Rohit Arya: मुंबईच्या पवई भागात गुरूवारी दुपारी एक धक्कादायक घटना घडली. एक शूटिंगच्या ऑडिशनच्या बहाण्याने काही लहान मुलांना आरए स्टुडियोमध्ये बोलवण्यात आले. रोहित आर्य नावाच्या व्यक्तीने काही मागण्यांच्या बदल्यात या लहान मुलांना अचानक ओलीस ठेवले आणि एक व्हिडीओ जारी केला. त्यात त्याने म्हटले होते की, मला काही लोकांशी चर्चा करायची आहे. जर माझी मागणी पूर्ण झाली नाही तर मी स्फोट घडवून आणेन. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आतील सर्व मुलांची सुखरूप सुटका केली. मुंबईपोलिसांनी या सुटकेच्या थराराचा घटनाक्रम सांगितला.

बाथरूमच्या खिडकीतून घुसले पोलिस...

मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, "पावणे दोन वाजता पवई पोलीस ठाण्याला एक कॉल आला होता. त्यामध्ये असे सांगण्यात आले की एका व्यक्तीने महावीर क्लासिक नावाच्या बिल्डिंगमध्ये काही लहान मुलांना पोलीस ठेवले आहे. या कॉलला पवई पोलिसांनी आणि आमच्या स्टाफने तात्काळ रिप्लाय दिला आणि ते घटनास्थळी पोहोचले. स्पेशल युनिट्स आणि सर्व यंत्रणांना बोलवण्यात आले. ज्या व्यक्तींने मुलांना ओलीस ठेवले होते त्यांच्याशी सुरुवातीला चर्चा करण्यात येत होती. मात्र चर्चेतून काहीच निष्पन्न होत नाही असे दिसून आले. आत मध्ये लहान मुले होती. त्यामुळे वेळेवर निर्णय घेणे गरजेचे होते. मग आमच्या पवई पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी बाथरूम मधून प्रवेश केला. आतमधील एका नागरिकाच्या सहाय्याने सर्व मुलांची सुखरूप पणे सुटका करण्यात आली. सुटका झालेल्यांमध्ये एकूण १७ लहान मुले, एक ज्येष्ठ नागरिक आणि एक सामान्य नागरिकांचा समावेश होता." 

आरोपीचे नाव रोहित आर्य

"आरोपीकडे प्राथमिक तपासामध्ये एक एअरगन असल्याचे दिसून आले. तसेच काही केमिकल्स देखील असल्याचे दिसून आले. परंतु अजूनही क्राईम सीनचा सर्च सुरू आहे. हा शोध आणि तपास पूर्ण झाल्यावरच जास्त नीट सांगता येईल की त्याच्याकडे अजून काही हत्यार किंवा इतर गोष्टी होत्या की नव्हत्या. आरोपीचे नाव रोहित आर्य आहे. आरोपीकडून चौकशी दरम्यान आता आम्ही त्याच्या मागण्या काय होत्या हे जाणून घेऊ. त्याच्या नक्की मागण्या काय आहेत हे तपासादरम्यान जास्त नीटपणे समजून घेऊ शकतो. त्यावेळीच या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील," असेही पोलिस म्हणाले.

वेब सिरीजच्या बहाण्याने ऑडिशनचा बनाव

"वेब सिरीजचे ऑडिशन घ्यायचं म्हणून त्याने या सर्व मुलांना बोलावलं होतं. त्यासाठी त्याने या सोसायटीचा हॉल देखील घेतला होता. जी मुले या ऑडिशनसाठी आली, त्याच मुलांना त्याने ओलीस ठेवले. नंतर त्याने हा सारा प्रकार घडवून आणला. अखेर पवई पोलिसांनी आणि इतर स्पेशल फोर्सने सर्व गोष्टींचा अभ्यास करत सर्व ओलिसांना सुखरूप सोडवले आणि आरोपी रोहित आर्य याला ताब्यात घेतले," अशी माहितीही मुंबई पोलिसांनी दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai Police Rescue Children Hostages: Audition Turns into Terror

Web Summary : Mumbai police rescued 17 children, a senior citizen, and another adult held hostage in a studio under the guise of web series auditions. Accused Rohit Arya demanded negotiations, threatening an explosion. Police infiltrated via bathroom window, averting disaster and apprehending Arya, who possessed an airgun and chemicals.
टॅग्स :मुंबईगुन्हेगारीपोलिसमुंबई पोलीसवेबसीरिज