मुंबईतील कांदिवली येथील चारकोप परिसरात पत्नीची गळा आवळून हत्या केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली. आरोपी मूळचा ओडिशामधील रहिवाशी असून त्याने पत्नीकडे गावी जाण्यासाठी पैसे मागितले. परंतु, पत्नीने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर संतापलेल्या आरोपीने तिचा गळा आवळून हत्या केली, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली. याप्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दासा राणा (वय, ४१) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. राणा मूळचा ओडिशातील रहिवाशी असून तो त्याची पत्नी हिमंद्री हिच्यासोबत कांदिवलीतील चारकोप येथील एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत कामगार म्हणून काम करायचा. दोघेही गेल्या एक वर्षापासून आपल्या मुलासह याच इमारतीत राहत होते. शनिवारी दुपारी २:३० च्या सुमारास राणा आणि हिमंद्री यांच्यात पैशावरून भांडण सुरु झाले. राणाला त्याच्या गावी जाण्यासाठी पैसे हवे होते. परंतु, हिमंद्रीने त्याला पैसे देण्यास नकार दिला, ज्यामुळे त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. राणाने रागाच्या भरात प्रथम तिला मारहाण केली आणि नंतर बेडशीटने तिचा गळा दाबून तिची हत्या केली.
ही घटना घडली, तेव्हा राणाचा मुलगाही तिथे उपस्थित होता. मोठा आवाज ऐकून इतर कामगार जमले आणि त्यांनी राणाचा दरवाजा ठोठावला. राणाने दार उघडल्यानंतर कामगारांना हिमाद्री बेशुद्धावस्थेत आढळली. कामगार कंत्राटदाराला घटनेची माहिती देण्यात आली आणि त्यांनी तिला तातडीने रुग्णालयात नेले, तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
याप्रकरणी पोलिसांनी राणाची चौकशी केली. परंतु, सुरुवातीला त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली. परंतु, त्याचा मुलगा घटनेचा साक्षीदार होता आणि त्याने पोलिसांना हत्येची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी राणाविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.