मुंबईतील बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इमारतीला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली. बीएसईच्या अधिकृत वेबसाइटवर धमकीचा ईमेल आला, त्यानंतर एकच खळबळ माजली. माहिती मिळताच मुंबई पोलीस आणि बॉम्ब शोधक पथकाने घटनास्थळी पोहोचून परिसरात शोध मोहीम सुरू केली. परंतु, पोलिसांना कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. याप्रकरणी रमाबाई मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून धमकीचा ईमेल पाठवणाऱ्याचा शोध सुरू आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बीएसईच्या अधिकृत वेबसाइटवरील ईमेलद्वारे ही धमकी देण्यात आली. रविवारी कार्यालय बंद असल्याने बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्याला सोमवारी या ईमेलबाबत माहिती मिळाली आणि त्यांनी ताबडतोब पोलिसांशी संपर्क साधला. "बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या फिरोज टॉवर इमारतीत ४ आरडीएक्स आयईडी बॉम्ब ठेवण्यात आले आहेत आणि दुपारी ३ वाजता स्फोट होतील", असे ईमेलमध्ये लिहिण्यात आले.
दरम्यान, पोलिसांनी आणि बॉम्ब शोधक पथकाने घटनास्थळी पोहोचून तपासणी केली असता कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. याप्रकरणी बीएनएसच्या कलम ३५१(१)(ब), ३५३(२), ३५१(३), ३५१(४) अंतर्गत आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.