लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई: कोस्टल रोडचा प्रवास चारचाकी वाहनांशिवाय सामान्यांनाही करता यावा आणि त्यांचा प्रवास गतीने व्हावा यासाठी बेस्ट उपक्रमाकडून नवीन वातानुकूलित बससेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. बस मार्ग ए-८४ ही नवीन बससेवा रविवारपासून सुरू होत असून, डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी चौक ते ओशिवरा बस आगारादरम्यानची ही सेवा कोस्टल रोडवरून धावणार आहे. या मार्गावर कोस्टल रोडदरम्यान पारशी रुग्णालय, महालक्ष्मी मंदिर, नेहरू तारांगण, वरळी दुग्धालय या ठिकाणी थांबे आहेत. स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारा (कोस्टल रोड) मार्गाचे काम सुरू होण्याच्या आधीपासून बस व रुग्णवाहिकेसाठी स्वतंत्र मार्गिकेचे नियोजन करण्यात आले होते. मार्गावर अवजड वाहने, दुचाकी, तीन चाकी आणि पादचाऱ्यांना प्रवेश नसल्याने या मार्गावरून जायचे असल्यास केवळ स्वत:चे वाहन किंवा टॅक्सीचाच पर्याय आहे. बेस्टमुळे सर्वसामान्यांनाही तेथून प्रवास करणे शक्य झाले आहे.
किमान १५ ते कमाल ५० रुपये भाडे या आधी बेस्टकडून एनसीपीए ते भायखळा ही ए-७८ बसमार्गिका सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर आता संपूर्ण कोस्टल रोड खुला केल्यानंतर बेस्टने दुसरी बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी चौक ते ओशिवरा बस आगारादरम्यान या बसप्रवासाचे किमान भाडे १५ रुपये आणि कमाल भाडे ५० रुपये आहे. ही सेवा आठवड्याच्या सातही दिवस कार्यरत असणार आहे.
स्थानक | पहिली बस | शेवटची बस |
ओशिवरा आगार | ७:१५ वा. | १७:२० वा. |
डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी चौक | ८:५० वा. | १९:१५ वा. |
नवीन बसमार्ग जलद व सुरक्षित नव्याने सुरू करण्यात येत असलेला बसमार्ग ए-८४ हा दक्षिण आणि पश्चिम मुंबईतील प्रमुख भागांना सागरी किनारी मार्गाने जोडल्याने प्रवाशांचा प्रवास कालावधी कमी होईल. ही बस डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक (संग्रहालय), अहिल्याबाई होळकर चौक (चर्चगेट स्थानक), स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारा मार्ग (कोस्टल रोड), वरळी सी फेस, वरळी आगार, बाबासाहेब वरळीकर चौक, महापौर बंगला (शिवाजी पार्क), माहीम, खार स्थानक रोड (पश्चिम), सांताक्रूझ आगार, विर्लेपार्ले, अंधेरी स्थानक (पश्चिम), ओशिवरा पूल, ओशिवरा आगार यासारख्या महत्त्वाच्या ठिकाणांहून प्रवास करील.