मुंबईत रात्रभर लोकल हवीच! वाहतूक व्यवस्थेतील हा बदल महत्त्वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2022 09:58 AM2022-03-27T09:58:20+5:302022-03-27T09:58:50+5:30

बाहेरगावाहून मुंबईत येणाऱ्या अनेक गाड्या मध्यरात्री, पहाटे येतात.

Mumbai needs local overnight! This change in the transportation system is significant | मुंबईत रात्रभर लोकल हवीच! वाहतूक व्यवस्थेतील हा बदल महत्त्वाचा

मुंबईत रात्रभर लोकल हवीच! वाहतूक व्यवस्थेतील हा बदल महत्त्वाचा

Next

मिलिंद बेल्हे

पुण्याहून करमाळीला जाणारी गाडी चार तास रखडल्याने पनवेलला आलेल्या प्रवाशांची शेवटची ट्रेन चुकली आणि त्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने मध्य रेल्वेला अखेर मध्यरात्री विशेष लोकल सोडावी लागल्याची घटना मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल करावे लागतील, हेच सांगणारी आहे. पूर्वी रात्री पावणेतीन तास बंद राहणारी लोकलची वाहतूक सध्या सव्वातीन तास बंद असते. हा वेळ कमी होण्याऐवजी वाढतो आहे. तो कमी करून रात्रभर लोकल सोडण्याचा निर्णय रेल्वेला घ्यावा लागेल, अशी सध्याची स्थिती आहे. त्यासाठी ज्या मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील ज्या राजकीय नेत्यांनी दबाव आणायला हवा, त्यातील कोणीही ट्रेन, लोकलमधून प्रवास करत नसल्याने त्यांना या प्रश्नाचे गांभीर्य लक्षातच येत नाही. पण ७५ लाखांच्या घरात असलेल्या लोकल प्रवाशांसाठी हा प्रश्न अत्यंत जिव्हाळ्याचा आहे.

मुंबईसारख्या महानगरात रात्रजीवन (नाइटलाइफ) सुरू करण्याचा गाजावाजा झाल्यानंतर तीन वर्षांपूर्वी अनेक हॉटेल, पब, मॉल, सुपर मार्केट, फड डिलिव्हरी करणाऱ्या चेन यांना मध्यरात्रीपर्यंत व्यवसाय सुरू करण्याची मुदत देण्यात आली. (नंतर कोरोनामुळे त्याला पुरेशी गती येऊ शकली नाही, हा भाग वेगळा.) तेव्हाच नाइटलाइफसाठी आणि त्या व्यवस्थेत काम करणाऱ्यांसाठी रात्रभर वाहतूक सुरू असायला हवी हा मुद्दा समोर आला होता. पण त्यावर निर्णय झाला नाही. मुंबई टप्प्याटप्प्याने रात्रभर सुरू रहिली, तर वर्दळ वाढेल आणि रात्रीच्या गुन्ह्यांत घट होईल, असे म्हणणे तेव्हा पोलिसांनीही मांडले होते. 

बाहेरगावाहून मुंबईत येणाऱ्या अनेक गाड्या मध्यरात्री, पहाटे येतात. रखडलेल्या गाड्याही अशाच उशिरा वेगवेगळ्या स्टेशनवर दाखल होतात. पण सुरक्षेचे कारण पुढे करत त्यातील प्रवाशांना स्थानकांत थांबू न देता बाहेर पाठवले जाते. मग मुले-बाळे, महिला, वृद्ध, आजारी व्यक्ती यांना सामानसुमानासकट कधी रस्स्त्यावर, पुलावर लोकलची वाट पाहात उभे रहावे लागते. कधी त्यांना प्रसाधनगृहे वापरू दिली जातात, कधी ती सुविधाही नसते. हॉटेल, कॅन्टीन बंद असतात. या प्रवाशांचे अतोनात हाल होतात. जर रात्रभर लोकल उपलब्ध असतील, तर हे हाल नक्की कमी होऊ शकतात. 
मुंबईत अनेक कार्यालये रात्री उशिरापर्यंत सुरू असतात. त्यांनाही या निर्णयामुळे दिलासा मिळेल. अनेकदा क्रिकेट मॅच, थर्टी फर्स्टला अशा विशेष गाड्या सोडल्या जातात. त्यामुळे रेल्वेच्या दृष्टीने पाहता फक्त मंत्र्यांनी निर्णय घेण्याची गरज आहे. सुरुवातीला पाऊण ते एक तासाने मुंबई ते कल्याण, पनवेलपर्यंत गाड्या सोडून चाचणी घेता येऊ शकते. नंतर प्रतिसाद पाहून या फेऱ्यांत वाढ करता येऊ शकते. गरज आहे, ती इच्छाशक्तीची. प्रवाशांचा विचार करून निर्णय घेण्याची. 

Web Title: Mumbai needs local overnight! This change in the transportation system is significant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.