'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 21:13 IST2025-12-18T21:10:00+5:302025-12-18T21:13:55+5:30
मुंबई महापालिकेच्या २२७ वॉर्डसाठी २४०० हून अधिक इच्छुकांनी दिल्या मुलाखती

'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
Mumbai Municipal Elections, Eknath Shinde Shiv Sena female candidates: महापालिका निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यापासून राज्यासह देशाचे लक्ष मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे लागले आहे. यंदा पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे ठाकरे बंधू एकत्र निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. दुसरीकडे भाजपा आणि शिंदेंची शिवसेना यांची युती असणार आहे. तर काँग्रेस आणि अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर लढणार असल्याचे बोलले जात आहे. महायुतीसाठी लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली यात दुमत नाही. विधानसभेला महिला मोठ्या संख्येने मतदानाला आल्याचे चित्र दिसले. हा उत्साह तिथेच थांबलेला नाही, तर आता महापालिका निवडणुकांमध्येही उमेदवारी मिळवण्यासाठी लाडक्या बहिणी आघाडीवर आहेत.
मुंबई महापालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर शिवसेनेतून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांनी गर्दी केली. शिवसेनेकडून इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यात २४००हून अधिक इच्छुकांनी मुलाखत दिल्याची माहिती शिवसेना नेते व माजी खासदार राहुल शेवाळे यांनी दिली. महापालिका निवडणुकीत शिवसेनेकडून उमेदवारी मिळावी, यासाठी हजारो इच्छुक आहेत. पालिका निवडणूक शिवसेना महायुती म्हणूनच लढणार आहे; मात्र निवडणुकीत योग्य उमेदवार असावा यासाठी पक्षाकडून आज रंगशारदा येथे मुलाखत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, असे ते म्हणाले.
मुंबईतील लोकसभा मतदार संघनिहाय इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. पक्षाकडून प्रत्येक लोकसभा क्षेत्रासाठी तीन निरीक्षकांची यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईत सर्व पक्षांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या, पण इतका प्रचंड प्रतिसाद कुणालाही मिळाला नाही, जो प्रतिसाद शिवसेनेला मिळाला. शिवसेनेतून निवडणूक लढवण्यासाठी महिला इच्छुकांची विक्रमी गर्दी पाहायला मिळाली. २२७ वॉर्डसाठी २४०० हून अधिक जणांनी मुलाखत दिली. यात मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षातील पदाधिकाऱ्यांनी सुद्धा आज शिवसेना पक्षासाठी मुलाखती दिली", असे शेवाळे म्हणाले.
"अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी राज्यात आणि मुंबईत केलेल्या विकासकामांनी एक प्रभावी छाप पाडली आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांचा जनमानसात प्रभाव असल्याने शिवसेनेला इच्छुकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे शिवसेनेला विजयाची खात्री आहे. त्यामुळे शिवसेनेला विजयाची खात्री आहे," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.