प्लास्टीक बाटलीपासून पालिका बनविणार टी-शर्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2023 08:15 IST2023-05-31T08:15:17+5:302023-05-31T08:15:33+5:30
वरळी, लोअर परळ उद्यानांत लावले मशीन

प्लास्टीक बाटलीपासून पालिका बनविणार टी-शर्ट
मुंबई : प्लास्टिक बॉटलपासून शहरात होणारे वाढते प्रदूषण पाहता, हे प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेने पुढाकार घेतला आहे. प्लास्टिक बॉटलपासून पालिका टी-शर्ट आणि बेंच बनविणार असून वरळी, लोअर परळ येथील उद्यानांत पालिकेने प्लास्टिकची विल्हेवाट लावणारी मशिन लावली आहेत. लवकरच मुंबईतील इतर उद्यानांतही अशा प्रकारची मशिन बसविण्यात येणार आहेत.
दि. ५ जून रोजी पालिकेच्या माध्यमातून पर्यावरण दिन साजरा केला जाणार असून, याचाच भाग म्हणून पालिका रिसायकल इंडिया फाउंडेशनच्या माध्यमातून या मशिन बसविणार आहेत.
या मशिनची किंमत पाच लाख रुपये असून, पालिका सामाजिक संस्थेसह सीएसआर प्रकल्पातून हे काम करणार आहे.
पालिकेच्या वरळी येथील भगवान बुद्ध, लोअर परळ येथील विलास विठोबा शिंदे या उद्यानात ही मशिन बसविण्यात आली आहेत.
एका मशीनद्वारे सुमारे दोन हजार बाटल्यांची विल्हेवाट लावली जाते. त्यानंतर विल्हेवाट लावलेल्या प्लास्टिकपासून टी शर्ट, बेंच बनविले जातात, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.