मुंबईकरांना आता कचऱ्यावर कर भरावा लागणार! विधी विभागाचा सकारात्मक अभिप्राय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 11:19 IST2025-02-27T11:17:29+5:302025-02-27T11:19:39+5:30

मुंबईत कचरा संकलन कर लागू करण्याबाबत महापालिकेच्या विधि विभागाने सकारात्मक अभिप्राय दिला आहे.

mumbai municipal corporation to impose garbage collection tax | मुंबईकरांना आता कचऱ्यावर कर भरावा लागणार! विधी विभागाचा सकारात्मक अभिप्राय

मुंबईकरांना आता कचऱ्यावर कर भरावा लागणार! विधी विभागाचा सकारात्मक अभिप्राय

मुंबई

मुंबईत कचरा संकलन कर लागू करण्याबाबत महापालिकेच्या विधि विभागाने सकारात्मक अभिप्राय दिला आहे. त्यामुळे हा कर आकारणीचा महापालिकेचा मार्ग मोकळा झाला आहे. या कराच्या माध्यमातून महापालिकेच्या तिजोरीत वर्षाला ६८७ कोटी रुपये जमा होतील. महापालिकेची आर्थिक स्थिती सावरण्यासाठी महसूल वाढवण्याचे प्रयत्न सुरू असून या प्रयत्नाचा एक भाग म्हणून कचरा संकलन कर आकारला जाणार आहे. 

कचरा कर लागू करण्याचे सुतोवाच महापालिका प्रशासनाने अर्थसंकल्पात केले होते. मात्र, कर लागू करण्यासाठी कायद्यात काही बदल करणे आवश्यक होते. पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन कायद्यात २००६ मध्ये बदल झाला होता. त्यानंतर २०१६ मध्ये केंद्र सरकारने कचरा व्यवस्थापन कायद्यात मार्गदर्शक तत्त्वे समाविष्ट केली होती. ही तत्त्वे महापालिकेला लागू होती. 

नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागवणार
केंद्राची मार्गदर्शक तत्त्वे पालिकेलाही लागू असल्याचा आधार घेत पालिकेने कचरा संकलन कर लागू करण्याचा निर्णय घेतला होता. 

विधि विभागाकडे त्यासाठी सल्ला प्रशासनाने मागितला होता. तो मिळाला असून आता मुंबईकरांच्या सूचना आणि हरकती मागवण्यात येतील. 

कचरा विल्हेवाटीचा खर्च किती येतो?
मुंबई वगळता या पालिका मार्गदर्शक तत्त्वानुसार अतिरिक्त कराची आकारणी करतात. 
१. मुंबई- ३१४१ रुपये (दरडोई)
२. पुणे- १७२४ रुपये (दरडोई)
३. कोलकाता- १५८४ रुपये (दरडोई)
४. बंगळुरू- १३३५ रुपये (दरडोई)

मुंबईत ७५०० टन कचरा दररोज जमा होतो. मुंबईछी वाढती लोकसंख्या आणि कचऱ्याचे वाढते प्रमाण लक्षात घेता कचरा हाताळणीसाठी कर आकारणी होणार आहे. त्याचबरोबर पालिकेचा महसूल वाढवणे हा देखील मुख्य मुद्दा आहे. 

अशी होईल कराची आकारणी
- ५० चौरस मीटरच्या घरांना १०० रुपये कर असेल
- ३०० चौरस मीटरपर्यंतच्या घरांना ३०० रुपये.
- ३०० चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळाच्या घरांना १ हजार रुपये द्यावे लागतील
- आस्थापना, क्लिनिक, कॉटेज इंडस्ट्रीज आणि मंगल कार्यालये यांच्यासाठी किमान ५०० रुपयांपासून पुढे कर घेतला जाईल. 

Web Title: mumbai municipal corporation to impose garbage collection tax

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.