५३ बांधकामे महापालिकेने थांबवली; प्रदूषण मोजणारे ११७ सेन्सर्स बंद, अनेक विकासक रडारवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 06:50 IST2025-11-28T06:50:19+5:302025-11-28T06:50:45+5:30
वायू प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेने २८ मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. ती सर्व प्राधिकरणांना बंधनकारक करण्यात आली आहेत. तरीही अनेक विकासक ती पाळत नसल्यामुळे काही आठवड्यांपासून हवा प्रदूषणाचा स्तर सातत्याने ‘वाईट’ श्रेणीत येत आहे. त्याची गंभीर दखल पालिकेने घेतली आहे.

५३ बांधकामे महापालिकेने थांबवली; प्रदूषण मोजणारे ११७ सेन्सर्स बंद, अनेक विकासक रडारवर
मुंबई - वाढत्या हवा प्रदूषणाला आळा घालण्यासाठी मुंबई महापालिकेच्या भरारी पथकाने ५३ बांधकामांना काम थांबवण्याची नोटीस बजावली आहे. त्यात जी- दक्षिण विभागाच्या सिद्धार्थनगर परिसरातील १७, ई-विभागाच्या माझगाव परिसरातील ५, पी-उत्तर’ विभागातील मालाड (पश्चिम) परिसरातील ३१ बांधकामांचा समावेश आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांनी गुरुवारी दिली, तसेच बांधकामस्थळांच्या ठिकाणचे प्रदूषण मोजणारे ११७ सेन्सर्स बंद असल्याचे निष्पन्न झाले आहे.
बिल्डरांची सेन्सर्सना बगल
बिल्डरांनी सर्व बांधकामांच्या ठिकाणी धूळ प्रदूषण निदर्शक सेन्सर-आधारित उपकरण लावणे पालिकेने गेल्या जूनमध्ये बंधनकारक केले होते. मात्र, केवळ ४४ टक्के विकासकांनीच सेन्सर लावले आहेत. मुंबईत ६६२ सेन्सर्स बसविण्यात आले आहेत, तर २५१ सेन्सर्स बसवण्यात येत आहेत. यातील ४०० सेन्सर्स मुंबईतील हवेची प्रदूषण पातळी मोजण्यासाठी डॅश बोर्डशी जोडले आहेत. मात्र यापैकी ११७ सेन्सर बंद असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भरारी पथके कारवाई करतील, अशी माहिती डॉ. जोशी यांनी दिली.
कुठे, कशासाठी नोटीस?
एम-पूर्व विभागातील प्रदूषणकारी आरएमसी प्लांट्सवर कारवाई करण्याची प्रदूषण नियंत्रण मंडळाला सूचना
ए वॉर्डातील नेव्हीनगर येथील चिंताजनक प्रदूषणाबाबत नौदलाला पत्र
मालाड पश्चिमेच्या ३१ बांधकामांच्या ठिकाणी ओझोनचा थर अधिक असल्याने पाणी शिंपडण्याची सूचना
माझगावच्या ५ बांधकामांना नोटीस, प्रदूषणकारी बेकरीच्या चिमणीवर कारवाई
अंधेरी चकाला भागात मार्बल कटिंग व्यवसायामुळे वाढत्या प्रदूषणाची दखल