पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी मुंबई मनपाकडून मूर्तिकारांना आतापर्यंत ९१० टन मोफत शाडू माती
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 23:04 IST2025-07-25T23:03:58+5:302025-07-25T23:04:15+5:30
Eco-Friendly Ganeshotsav: मुंबई महानगरात शाडू मातीच्या मूर्ती घडविण्याकरिता प्रोत्साहन मिळावे, जास्तीत जास्त पर्यावरणपूरक मूर्तींची प्रतिष्ठापना व्हावी यासाठी महानगरपालिकेकडून पर्यावरणपूरक मूर्ती घडविणाऱ्या मूर्तिकारांना दरवर्षीप्रमाणे यंदाही मोफत शाडू माती पुरविण्यात आली आहे.

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी मुंबई मनपाकडून मूर्तिकारांना आतापर्यंत ९१० टन मोफत शाडू माती
मुंबई - मुंबई महानगरात शाडू मातीच्या मूर्ती घडविण्याकरिता प्रोत्साहन मिळावे, जास्तीत जास्त पर्यावरणपूरक मूर्तींची प्रतिष्ठापना व्हावी यासाठी महानगरपालिकेकडून पर्यावरणपूरक मूर्ती घडविणाऱ्या मूर्तिकारांना दरवर्षीप्रमाणे यंदाही मोफत शाडू माती पुरविण्यात आली आहे. प्रत्येक परिमंडळात १०० टनासोबत आवश्यक तेवढी शाडू माती मूर्तिकारांना विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. आतापर्यंत एकूण ९१० टन इतकी शाडू माती मोफत देण्यात आली आहे.
यासोबतच पर्यावरणपूरक मूर्ती घडविणाऱ्या एकूण ९९३ मूर्तिकारांना मूर्ती घडविण्यासाठी मंडप परवानगी देण्यात आली आहे. ज्या मूर्तिकारांना आणखी शाडू माती हवी असेल, त्यांनी महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर (www.mcgm.gov.in) ‘नागरिकांकरीता’ या रकान्यामध्ये ‘अर्ज करा’ या रकान्यात ‘मंडप (सार्वजनिक गणेशोत्सव/नवरात्रौत्सव/इतर उत्सव)’ या सदरामध्ये मागणी नोंदवावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने उप आयुक्त (परिमंडळ २) तथा श्रीगणेशोत्सवाचे समन्वयक श्री. प्रशांत सपकाळे यांनी केले आहे.
दरम्यान, सन २०२४ मध्ये २०० पेक्षा अधिक मूर्तिकारांना मिळून ५०० टन इतकी माती मोफत देण्यात आली होती. त्यातुलनेत यावर्षी एप्रिल २०२५ पासूनच पर्यावरणपूरक मूर्ती घडविण्यासाठी मूर्तिकारांनी मोठ्या प्रमाणात शाडू मातीची मागणी केली अणि महानगरपालिकेने त्यांची मागणी पूर्ण केली आहे, हे उल्लेखनीय आहे.
श्रीगणेशोत्सव सन २०२५ पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यासाठी महानगरपालिकेने नियोजन व कार्यवाही देखील सुरू केली आहे. प्रशासनाकडून निरनिराळ्या सेवा-सुविधा पुरविण्यात येत आहेत. पर्यावरणपूरक उत्सवासाठी सर्व बाबींचा अवलंब केला जात आहे. यावर्षी दिनांक २५ जुलै २०२५ पर्यंत ९१० टन २३५ किलो इतकी शाडू माती मोफत वाटप करण्यात आली आहे. सर्वाधिक शाडू मातीचे वितरण हे ‘के पूर्व’ विभागात झाले असून, या विभागात ९६ टन ६१५ किलो इतकी शाडू माती वाटप झाली. त्यापाठोपाठ ‘जी उत्तर’ विभागात ९१ टन २० किलो, ‘पी उत्तर’ विभागात ८२ टन ४५५ किलो, ‘डी’ विभागात ७४ टन २०० किलो; तर ‘एफ दक्षिण’ विभागात ७२ टन ६०० किलो शाडू माती वाटप करण्यात आली.
पर्यावरणपूरक मूर्ती घडविणाऱया ९९३ मूर्तिकारांना विनामूल्य मंडप जागा
पर्यावरणपूरक मूर्ती घडविणाऱया मूर्तिकारांसाठी महानगरपालिकेच्या उपलब्ध असलेल्या जागेनुसार ‘प्रथम अर्जदारास प्राधान्य’ या तत्वावर आवश्यक ती जागा देखील विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली आहे. पर्यावरणपूरक मूर्ती घडविणाऱ्या ९९३ मूर्तिकारांना मंडपासाठी परवानगी देण्यात आली असून त्यांना मूर्ती घडविण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात जागाही मोफत देण्यात आली आहे. यामध्ये आर दक्षिण विभागातून १३९ मूर्तिकारांना त्यापाठोपाठ के पश्चिम विभागात ९० मूर्तिकारांना तसेच पी उत्तर विभागात ७४, पी दक्षिण विभागात ७२ मूर्तिकारांना मंडपासाठी परवानगी देण्यात आली आहे.