मुंबई महापालिकेकडून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आरोग्य सेवेच्या तरतुदीत एक टक्काच वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 09:51 IST2026-02-26T09:48:31+5:302026-02-26T09:51:09+5:30

यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य सेवेसाठी रु. ७,४५६ कोटींची तरतूद केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ साधारण १ टक्का असल्याचे दिसून आले आहे.

Mumbai Municipal Corporation had allocated Rs 7,380 crore in the budget last year and Rs 7,456 crore this year. | मुंबई महापालिकेकडून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आरोग्य सेवेच्या तरतुदीत एक टक्काच वाढ

मुंबई महापालिकेकडून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आरोग्य सेवेच्या तरतुदीत एक टक्काच वाढ

-सुजित महामुलकर, मुंबई 
मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात वर्षभरात ६,५२५ कोटी (८ टक्के) रुपयांची वाढ झाली असली तरी आरोग्य सेवांसाठीच्या तरतुदीत मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत जेमतेम १ टक्का वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मुंबईत नागरिकांना प्राथमिक शिक्षण आणि आरोग्य सुविधा पुरविण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून मुंबई महापालिकेची आहे. गेल्या वर्षी पालिकेने आरोग्य सेवांसाठी अर्थसंकल्पात रु. ७,३८० कोटींची आर्थिक तरतूद केली होती. तर यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य सेवेसाठी रु. ७,४५६ कोटींची तरतूद केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ साधारण १ टक्का असल्याचे दिसून आले आहे.

महापालिकेने जेनेरिक औषधे देण्यावर भर दिला असून, नागरिकांना परवडणारी, गुणवत्तापूर्ण नॉन-शेड्युल औषधे देण्यासाठी शहरातील ५० निवडक ठिकाणी स्टोअर्स सुरू करण्यात येणार आहेत. तसेच रुग्णालयाच्या आवारात रुग्ण व रुग्णांच्या नातेवाइकांसाठी स्नानगृह, शौचालय, यांत्रिक धुलाई अशा सेवा सीएसआर निधीतून मात्र 'पैसे द्या आणि वापरा' या तत्त्वावर सुरू करण्यात येणार आहेत, असे आयुक्त गगराणी यांनी स्पष्ट केले. 

पालिकेच्या केईएम, लोकमान्य टिळक (सायन) आणि नायर रुग्णालयासह चार रुग्णालयांत नव्या एमआरआय मशीन दिल्या जातील. तसेच अनेक रुग्णालयांच्या -इमारतींची डागडुजी, पुनर्विकास करण्यात येणार आहे. त्यात कस्तुरबा, अॅक्वर्थ कुष्ठरोग रुग्णालय, सेठ ए. जे. बी. कान, नाक, घसा रुग्णालय, मुलुंडचे अगरवाल रुग्णालय, गोवंडी शताब्दी, बोरीवली भगवती, घाटकोपर राजावाडी, विक्रोळीचे महात्मा फुले रुग्णालय, गोरेगावचे सिद्धार्थ रुग्णालय यांचा समावेश आहे.

तरुणांनी सुदृढ व आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारावी यासाठी १०० महाविद्यालयांत 'आरोग्यदायी वातावरण' उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. हिवताप व डेंग्यू या आजारांवर प्रभावी नियंत्रणाचे उद्दिष्ट, पालिकेचे दवाखाने आणि आपला दवाखाना येथील मधुमेही रुग्णांसाठी मधुमेहजन्य नेत्ररोगाकरिता कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित मोफत नेत्र तपासणी व उपचार सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

तरतुदीइतका झालाच नाही खर्च

गेल्या अनेक वर्षांत अर्थसंकल्पात केलेली तरतूद १०० टक्के खर्च झालेली नाही. गेल्या वर्षी (२०२५-२६) रु ७,३८० कोटींची तरतूद केली पण प्रत्यक्ष खर्च ६,१०४ कोटी खर्च होईल, असा सुधारित अंदाज महापालिकेने या अर्थसंकल्पात व्यक्त केला आहे. त्यापूर्वी २०२४-२५ मध्ये पालिकेने आरोग्यासाठी ७,१९१ कोटी तरतूद केली तर प्रत्यक्ष खर्च रु ५,५०७ कोटी झाला.

मुंबई महापालिका आरोग्य आराखडा

असंसर्गजन्य रोग नियंत्रण

फेब्रुवारी २०२५ पासून ३ लाखांहून अधिक नागरिकांची कर्करोग तपासणी, पुढील वर्षात तपासणी मोहिमेचा विस्तार.

'नमो नेत्र संजीवनी'

स्मार्ट नेत्र ज्योती, मधुमेही रुग्णांसाठी एआय-आधारित मोफत नेत्रतपासणी, मुंबई महापालिका दवाखाने आणि 'आपला दवाखाना' येथे सेवा.

फिट मुंबई अभियान 

'फिट इंडिया'अंतर्गत कामाची ठिकाणे, मैदाने, उद्याने येथे जनजागृती, सीएसआर माध्यमातून उपक्रम. १०० महाविद्यालयांत 'आरोग्यदायी वातावरण' मोहीम.

क्षयरोग नियंत्रण 

'क्षयरोग मुक्त भारत अभियान २०२५-२६, डब्ल्यूजीएस चाचणीद्वारे औषध-प्रतिरोधक टीबी निदान, एमडीआर रुग्णांसाठी 'BPALM' अत्याधुनिक उपचार.

साथरोग नियंत्रण 

मलेरिया व डेंग्यू रुग्णांवर १, ३ व ७ व्या दिवशी पाठपुरावा, लक्ष्याधारित क्षेत्र सर्वेक्षण.

कुटुंब कल्याण

३८ ठिकाणी 'माँ मित्र' उपक्रम. किशोरवयीन मुलांमध्ये कौटुंबिक हिंसाचाराविरोधात जागरूकता.

लसीकरण 

१४ वर्षांच्या मुलींसाठी HPV लसीकरण, U-WIN पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी.

सार्वजनिक-खासगी सहभाग 

एक डायलेसिस केंद्र सुरू, पुढील टप्प्यात ३ डायलेसिस, ३ निदान केंद्रे, सीटी स्कॅन, एमआरआय, रक्तपेढी सुविधा वाढणार.

डिजिटल जनगणना २०२७ 

पहिल्या टप्प्यात घरांची यादी व घरगणना, दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्या गणना.

माध्यमिक आरोग्य सेवा 

मालाड, बोरिवली, मुलुंड, बर्वेनगर रुग्णालयांत डीएनबी अभ्यासक्रम, केंद्रीकृत रुग्णशय्या डॅशबोर्ड.

सरकारी योजनांचा लाभ 

किमान २५% रुग्णांना विविध आरोग्य योजनांचा लाभ. जास्तीत जास्त प्रतिपूर्ती मिळवणाऱ्या रुग्णालयांचा विशेष गौरव.

नागरी सुविधा केंद्र 

रुग्णालय परिसरात स्नानगृह, शौचालय, धुलाई सेवा (सीएसआर फंड) 'पैसे द्या आणि वापरा' तत्त्वावर सुविधा.

जेनरिक औषधी 

५० ठिकाणी NACOF जेनरिक मेडिकल स्टोअर्स, परवडणारी, गुणवत्तापूर्ण औषधी उपलब्ध करणार.

Web Title : मुंबई नगर निगम का स्वास्थ्य बजट: मामूली वृद्धि, जेनेरिक दवाओं पर ध्यान

Web Summary : मुंबई के स्वास्थ्य बजट में मामूली वृद्धि हुई है। 50 नए स्टोर और अस्पताल उन्नयन के माध्यम से जेनेरिक दवाओं पर ध्यान केंद्रित किया गया है। पहलों में रोग नियंत्रण, मुफ्त नेत्र जांच और कॉलेज स्वास्थ्य कार्यक्रम शामिल हैं। खर्च अक्सर आवंटन से कम होता है।

Web Title : Mumbai Municipality's Health Budget: Slight Increase, Focus on Generic Medicines

Web Summary : Mumbai's health budget sees a marginal rise. The focus is on generic medicines via 50 new stores and hospital upgrades. Initiatives include disease control, free eye checkups, and college health programs. Spending often falls short of allocations.