विकास जिंकला, भावनिक मुद्दे पराभूत : एकनाथ शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 05:57 IST2026-01-19T05:56:53+5:302026-01-19T05:57:20+5:30
नगरसेवकांना कामाला लागण्याचे आदेश

विकास जिंकला, भावनिक मुद्दे पराभूत : एकनाथ शिंदे
मुंबई : मुंबईकरांनी दिलेल्या संधीचे सोने करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. प्रत्येक नगरसेवकाने प्रभागाला मुंबईतील सर्वोत्तम प्रभाग बनवण्यासाठी थेट लोकांमध्ये जाऊन काम करावे, स्पष्ट आराखडा तयार करावा आणि विकास प्रत्यक्षात दिसेल याची काळजी घ्यावी, असे आदेश शिंदेसेनेचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी दिले. विकास जिंकला आणि भावनिक मुद्दे पराभूत झाले, अशा शब्दात शिंदे यांनी उद्धवसेनेवर टीका केली.
ताज लँड्स एंड येथे आयोजित नवनिर्वाचित नगरसेवकांच्या बैठकीत शिंदे बोलत होते. या नगरसेवकांना पुढील तीन दिवस हॉटेलमध्येच ठेवण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबईतून निवडून आलेल्या २९ नगरसेवकांचे अभिनंदन करत आजपासूनच कामाला लागण्याचे आवाहन केले. सकाळी लवकर उठून वॉर्डचा फेरफटका मारा. स्वच्छता, नियमित पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन यांसारख्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य द्या. डीप क्लीन ड्राइव्ह राबवा. वॉर्डमध्ये झालेले बदल स्पष्टपणे दिसले पाहिजेत, असे त्यांनी सांगितले. बाजारपेठा, मंडई, व्यायामशाळा, क्रीडा संकुले यांसारख्या मोठ्या विकासकामांचे प्रस्ताव तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. आरोग्यसेवा सुधारण्यावर विशेष भर देत, शिवसेनेचा नगरसेवक कायम जनतेत दिसला पाहिजे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
कामे करण्यास नकार नको
कोणत्याही कामाला नकार देऊ नका, नागरिक नाराज होता कामा नयेत आणि तक्रारींची संधीच राहू देऊ नका, असा सल्ला त्यांनी दिला. भावनिक मुद्दे पराभूत झाले आणि महापालिका निवडणुकीत विकास जिंकला, अशी टीका करत जनतेला विकासच हवा असल्याचे शिंदे यांनी ठामपणे सांगितले. महायुती सरकारचे निर्णय, पागडीमुक्त मुंबई आणि ओसी मिळालेल्या इमारतींचा पाठपुरावा करण्यावरही त्यांनी भर दिला.