मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत राज्यातील सत्ताधारी असलेल्या महायुतीसमोर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या ठाकरे बंधूंच्या पक्षांनी एकत्र येत मोठं आव्हान उभं केलं आहे. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेत आता भाजपा आणि शिंदेसेना हे महायुतीमधील घटक पक्ष एकत्र लढणार असल्याचेही आता निश्चित झाले आहे. मात्र दोन्ही पक्षांमधील जागावाटपाचा तिढा अद्याप पूर्णपणे सुटलेला नाही. पण मुंबई महानगरपालिकेतील २२७ जागांपैकी २०७ जागांबाबत महायुतीमध्ये एकमत झालं असून, या २०७ जागांपैकी १२८ जागंवर भाजपा तर ७९ जागांवर शिंदेसेना लढणार असल्याची माहिती भाजपाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष अमित साटम यांनी दिली आहे.
याबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अमित साटम म्हणाले की, भाजपा आणि शिंदेसेना अशी महायुतीची मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकासंदर्भात संयुक्त बैठक झाली आहे. या संदर्भात प्रचाराचे मुद्दे इलेक्शन मॅनेजमेंट, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या संयुक्त सभा, प्रचाराचे संयुक्त कार्यक्रम, या सर्वांचं नियोजन करण्याकरिता आम्ही भेटलो होतो. या संदर्भातील आखणी आणि नियोजन झालं आहे, असे अमित साटम यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, जागावाटपाची चर्चाही याठिकाणी झालेली आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपा १२८ जागा आणि शिंदेसेना ७९ जागांवर अशा एकूण २०७ जागांवर आमचं एकमत झालं आहे. उर्वरित २० जागांची चर्चा सुरू आहे. वरिष्ठ पातळीवर चर्चा करून उरलेल्या या २० जागांवरही तोडगा काढण्यात येईल. तसेच समोर उमेदवार कोण आहे हे पाहून त्या ठिकाणी भाजपा लढणार की, शिंदेसेना लढणार यासंदर्भातील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती साटम यांनी दिली.
भाजपा आणि शिंदेसेनेची युती एवढी घट्ट आहे की त्यात कोण किती जागा लढतोय हे महत्त्वाचं नाही आहे. मुंबई महानगपालिकेला भ्रष्टाचारविरहित प्रशासन कोण देऊ शकतो, हे महत्त्वाचं आहे. विधानसभा निवडणुकीत तुम्ही पाहिलं असेल की भाजपाचे काही कार्यकर्ते धनुष्यबाण चिन्हावर लढले, तर शिवसेनेचे काही कार्यकर्ते कमळावर लढले, मात्र त्यामुळे काही फरक पडत नाही कारण आमची ही युती हिंदुत्वाकरिता झालेली .युती आहे, मुंबईकरांना भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देण्यासाठी झालेली युती आहे, असेही अमित साटम यांनी यावेळी सांगितले.
Web Summary : BJP and Shinde Sena to contest Mumbai civic polls together. Agreement reached on 207 seats: BJP to contest 128, Shinde Sena 79. Discussions ongoing for remaining 20 seats. Focus is corruption-free governance.
Web Summary : मुंबई नगर निगम चुनावों में भाजपा और शिंदे सेना साथ लड़ेंगे। 207 सीटों पर समझौता: भाजपा 128, शिंदे सेना 79 सीटों पर चुनाव लड़ेगी। शेष 20 सीटों पर बातचीत जारी है। भ्रष्टाचार मुक्त शासन पर ध्यान केंद्रित है।