मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे यांचा उद्धवसेना आणि राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे पक्ष एकत्र निवडणूक लढवणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. मात्र उद्धवसेना आणि मनसे यांच्या युतीची अधिकृत घोषणा कधी होणार? याबाबत दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आणि मुंबईतील मराठी माणसाला उत्सुकता होती. अखेरीस ठाकरे बंधूंच्या युतीबाबत मोठी बातमी समोर आली असून, बुधवारी २४ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता वरळीतील हॉटेल ब्ल्यू सीमधून उद्धवसेना आणि मनसेमधील युतीची अधिकृत घोषणा होणार आहे.
या पत्रकार परिषदेची अधिकृत माहिती मनसेकडून सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. नवे पर्व, मराठीजण सर्व! संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेली पत्रकार परिषद, उद्या दिनांक२४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२.०० वाजता हॉटेल, ब्लू सी, वरळी सी फेस, मुंबई येथे होणार आहे, अशी माहिती मनसेकडून देण्यात आली आहे. तत्पूर्वी उद्धवसेनेचे नेते संजय राऊत यांनीही आज ट्विट करत या पत्रकार परिषदेबाबत संकेत दिले होते.
गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर बदललेल्या राजकीय समीकरणांनंतर मुंबई महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धवसेना आणि मनसेच्या एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली होती. तसेच मराठीच्या मुद्द्यावरून उद्धव आणि राज हे ठाकरे बंधू अनेक वर्षांपासूनचा राजकीय दुरावा मिटवून एकत्र आले होते.
त्यानंतर उद्धव ठाकरे यांचा उद्धवसेना आणि राज ठाकरे यांचा मनसे यांच्यातील युतीच्या शक्यतेची चाचपणी सुरू झाली होती. तसेच राज आणि उद्धव ठाकरे यांनी नियमितपणे एकमेकांच्या भेटी घेऊन दोन्ही पक्षांमधील जागावाटप आणि इतर मुद्द्यांवर स्पष्टता आणत या युतीला आकार दिला होता. तसेच गेल्या काही दिवसांपासून दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून जागावाटपाला अंतिम रूप दिल्यानंतर अखेरीस या युतीच्या अधिकृत घोषणेला अधिकृत मुहुर्त निश्चित करण्यात आला आहे.
Web Summary : Uddhav Thackeray's Sena and Raj Thackeray's MNS will officially announce their alliance for the Mumbai Municipal Corporation elections on Wednesday at Hotel Blue Sea, Worli. Sanjay Raut hinted at the alliance press conference.
Web Summary : उद्धव ठाकरे की शिवसेना और राज ठाकरे की मनसे बुधवार को वर्ली के होटल ब्लू सी में मुंबई नगर निगम चुनाव के लिए आधिकारिक तौर पर गठबंधन की घोषणा करेंगे। संजय राउत ने गठबंधन की प्रेस कॉन्फ्रेंस का संकेत दिया।