‘मोदी आणि ईव्हीएमच्या बळावर भाजपा माज करतोय, कोणत्याही परिस्थितीत मुंबईला वाचवायचंय’, राज ठाकरेंचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 14:07 IST2025-12-29T14:05:55+5:302025-12-29T14:07:01+5:30
Mumbai Municipal Corporation Election: मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी लगबग सुरू असताना राज ठाकरे यांनी मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण आवाहन केलं आहे.

‘मोदी आणि ईव्हीएमच्या बळावर भाजपा माज करतोय, कोणत्याही परिस्थितीत मुंबईला वाचवायचंय’, राज ठाकरेंचं मोठं विधान
मुंबई महानगरपालिकेच्ये होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंची उद्धवसेना आणि राज ठाकरे यांनी मनसे या पक्षांनी युती करत राज्यातील सत्ताधारी असलेल्या भाजपा-शिंदेसेनेच्या महायुतीसमोर मोठं आव्हान उभं केलं आहे. दरम्यान, मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी लगबग सुरू असताना राज ठाकरे यांनी मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण आवाहन केलं आहे. नरेंद्र मोदी आणि ईव्हीएमच्या बळावर भाजपा माज करतोय, आपल्याला कोणत्याही परिस्थितीत मुंबई वाचवायची आहे, असं विधान राज ठाकरे यांनी केलं आहे.
यावेळी राज ठाकरे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ईव्हीएम सोबत असल्याने भाजपावाले माज करत आहेत. काही लोकांना मुंबई हातात घ्यायची आहे. त्यांचं हे स्वप्न गाडण्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे. मुंबई वाचवण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे. संकट नीट ओळखा,आपल्याला कोणत्याही परिस्थितीत मुंबई वाचवायची आहे, असे आवाहन राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना केलं आहे.
या निवडणुकीत कुणाला किती जागा मिळाल्या, याची आकडेवारी मांडून नाराज होऊ नका. मराठी माणसाच्या हितासमोर वैयक्तिक स्वार्थ क्षुल्लक आहे. आता मुंबई वाचवायची जबाबजारी आपली आहे. आपल्याला युतीधर्म पाळायचा आहे. ही निवडणूक आपल्या अस्तित्वाच्या लढाईसारखी आहे. कुठल्याही परिस्थितीत आपल्याला मुंबई हातात राखायची आहे, असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.