मतदानादिवशी ठाकरे बंधूंचे 'भगवा गार्ड' मैदानात उतरणार, दुबार, बोगस मतदारांना पकडणार आणि...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 15:49 IST2026-01-13T15:47:51+5:302026-01-13T15:49:00+5:30
Mumbai Municipal Corporation Election 2026: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत बोगस मतदान होऊ नये, दुबार आणि बनावट मतदारांनी मतदान करून मतचोरी करू नये यासाठी ठाकरे बंधूंनी खास रणनीती आखली आहे.

मतदानादिवशी ठाकरे बंधूंचे 'भगवा गार्ड' मैदानात उतरणार, दुबार, बोगस मतदारांना पकडणार आणि...
मुंबई महानगपालिका निवडणुकीसाठीचा प्रचार आज संध्याकाळी संपणार आहे. अतिशय चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीमध्ये मुंबईत भाजपा आणि शिंदेसेनेची महायुती विरुद्ध ठाकरे बंधूंच्या उद्धवसेना आणि मनसे यांची महायुती यांच्यात मुख्य लढत होताना दिसत आहे. दरम्यान, मुंबईतील मराठी माणूस आणि मराठी अस्मितेचा मुद्दा घेऊन निवडणुकीत उतरलेल्या ठाकरे बंधूंनी सत्ताधारी भाजपाविरोधात कमालीची आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच या निवडणुकीत बोगस मतदान होऊ नये, दुबार आणि बनावट मतदारांनी मतदान करून मतचोरी करू नये यासाठी ठाकरे बंधूंनी खास रणनीती आखली आहे.
दुबार आणि बोगस मतदारांना रोकण्यासाठी ठाकरे बंधूंचे भगवा गार्ड १५ जानेवारीला होणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या मतदानादिवशी रस्त्यावर उतरणार आहेत. हे भगवा गार्ड मतदान केंद्रांवर तैनात असणार आहेत. तसेच ते संशयित दुबार आणि बोगस मतदारांना पकडून त्यांना मतदान करण्यापासून रोखणार आहेत. दुबार आणि बोगस मतदारांच्या माध्यमातून होणारी मतांची चोरी रोखण्यासाठी ठाकरे बंधूंच्या पक्षांनी सुमारे २ हजार पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षित केले आहे.
दरम्यान, या भगवा गार्डबाबत भाष्य करताना संजय राऊत यांनी सांगितले की, दुबार मतदारांना ठोकण्याचा कार्यक्रम साकाळी सात वाजल्यापासून सुरू होईल. आम्ही आमचं एक पथक तयार केलेलं आहे. आम्ही दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन हे आमचं भरारी पथक तयार केलं आहे. दुबार मतदार दिसला की त्या पथकाला कळवायचं. त्यानंतर ते येऊन त्याचा करेक्ट कार्यक्रम करतील, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.