मुंबईत राजकीय उलथापालथ होणार? भाजपाचे १५ ते २० नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार; सेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2021 16:43 IST2021-10-18T16:42:28+5:302021-10-18T16:43:00+5:30
Mumbai Municipal Corporation: पक्ष नेतृत्त्वाच्या मनमानी कारभाराला भाजपाचे काही नगरसेवक कंटाळले असून जवळपास १५ ते २० नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा यशवंत जाधव यांनी केला आहे.

मुंबईत राजकीय उलथापालथ होणार? भाजपाचे १५ ते २० नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार; सेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ!
मुंबई-
मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण भाजपाचे जवळपास १५ ते २० नगरसेवक डिसेंबर महिन्यात शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष आणि शिवसेना नेते यशवंत जाधव यांनी केला आहे. जाधव यांच्या विधानानंतर एकच खळबळ उडाली आहे. पक्ष नेतृत्त्वाच्या मनमानी कारभाराला भाजपाचे काही नगरसेवक कंटाळले असून जवळपास १५ ते २० नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा यशवंत जाधव यांनी केला आहे.
"मुंबई पालिकेत असलेले भाजपाचे काही नगरसेवक निश्चितपणे भाजप नेतृत्त्वाला कंटाळले आहेत. मनमानी कारभार आणि त्यांना कुठंही विचारात न घेणं यामुळे भाजपा नगरसेवकांची निराशा झाली आहे. त्यामुळे असे नगरसेवक आता वेगळा विचार करत आहेत. त्याचा निकाल तुम्हाला डिसेंबर महिन्यात कळेल. भाजपाचे हे नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात आहेत", असं विधान यशवंत जाधव यांनी केलं आहे.
दुसरीकडे भाजपानेही आगामी पालिका निवडणुकीच्या दृष्टीकोनातून आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुंबई महापालिकेवर कमळ फुलविण्याचा निर्धार भाजपानं केला आहे. शिवसेनेची सत्ता उलथवून लावत महापालिकेवर भाजपाचा भगवा फडकविण्याचा निर्धार केल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.