मुंबई पालिका प्रशासनाची खबरदारी; ५ जम्बो केंद्रात ७४८ आयसीयू, ४०९९ ऑक्सिजन खाटा वाढविल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2021 18:37 IST2021-10-11T18:37:35+5:302021-10-11T18:37:49+5:30
मुंबईत १५ ऑगस्टपासून सर्व निर्बंध शिथिल करण्यास महापालिकेने सुरुवात केली.

मुंबई पालिका प्रशासनाची खबरदारी; ५ जम्बो केंद्रात ७४८ आयसीयू, ४०९९ ऑक्सिजन खाटा वाढविल्या
मुंबई - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार मुंबईत पूर्णपणे नियंत्रणात आला आहे. मात्र मागील काही दिवसांपासून बाधित रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ दिसून येत आहे. तर सक्रिय रुग्णांचा आकडाही पाच हजारांहून अधिक आहे. तरीही एकीकडे तिसरी लाट आली नसल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून केला जात असताना खाटांची क्षमता वाढविण्यात येत आहे. त्यानुसार वांद्रे - कुर्ला संकुल, दहिसर, सोमय्या, कांजूरमार्ग आणि मालाड या पाच जम्बो कोविड केंद्राच्या ठिकाणी आणखी ७४८ अति दक्षता खाटा आणि ४०९९ ऑक्सिजन खाटा वाढविण्यात आल्या आहेत.
मुंबईत १५ ऑगस्टपासून सर्व निर्बंध शिथिल करण्यास महापालिकेने सुरुवात केली. यामुळे सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढत असल्याने कोरोनाच्या संसर्गाचा धोका वाढला आहे. त्यामुळे मधल्या काळात अडीशेवर आलेली दररोजची रुग्ण संख्या ४५० ते ५५० वर पोहोचल्याने पालिका यंत्रणा सतर्क झाली आहे. त्यानुसार जम्बो कोविड केंद्रात खाटा तैनात ठेवण्यात आल्या आहेत. डिसेंबरपर्यंत कोरोना स्थिती पाहून या खाटा कमी करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
सध्या ११ टक्केच रुग्ण-
दहिसर, नेस्को गोरेगाव, वांद्रे कुर्ला संकुल, एनएससीआय वरळी, मुलुंड, भायखळा रिचर्डसन अँड क्रुडास अशी सहा जम्बो कोविड केंद्रे तैनात ठेवण्यात आली आहेत. या ठिकाणी असलेल्या १६ हजार खाटांवर १७०० म्हणजेच केवळ ११ टक्के रुग्ण उपचार घेत आहेत. तर मालाड आणि कांजूरमार्ग जम्बो कोविड केंद्र पालिकेच्या ताब्यात आली असून सायन येथेही जम्बो कोविड केंद्र उभारण्यात येत आहे.
जम्बो कोविड केंद्र...... विभाग..... खाटा
वांद्रे - कुर्ला संकुल : अति दक्षता - १०८
दहिसर : अति दक्षता - १००, ऑक्सिजन - ६१३, विना ऑक्सिजन : ११७
सोमय्या : अति दक्षता - २००, ऑक्सिजन - ७५०, पेडियाट्रिक अति दक्षता - ५०, पेडियाट्रिक - १००.
मालाड : अति दक्षता - १९०, ऑक्सिजन - १५३६, विना ऑक्सिजन - ३८४, डायलिसिस - २०, ट्राएज अति दक्षता - ४०
कांजूरमार्ग : अति दक्षता - १५०, ऑक्सिजन - १२००, विना ऑक्सिजन - ३००, पेडियाट्रिक अति दक्षता - ५०