मुंबई : शहरातील एका फर्टिलिटी सेंटरला एका मृत अविवाहित मुलाचे वीर्य पुढील आदेश देईपर्यंत गोठविण्याचे निर्देश दिले. त्या मुलाच्या आईने आपली वंशपरंपरा पुढे नेण्यासाठी या वीर्याचा वापर करू इच्छित असल्याचे उच्च न्यायालयाला सांगितले.
संबंधित फर्टिलिटी सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर या महिलेने न्यायालयात धाव घेतली. संबंधित व्यक्तीने उपचार घेत असताना दिलेल्या संमतीपत्रात मृत्यूनंतर वीर्य नष्ट करण्यात यावे, असे स्पष्ट केले आहे.
त्याला कॅन्सर झाल्याने किमोथेरेपीचे संभाव्य परिणाम लक्षात घेऊन त्याने वीर्य गोठविण्याचा निर्णय घेतला. जर मृताच्या गोठविलेल्या वीर्याची याचिकेवरील निर्णयाच्या आत विल्हेवाट लावली तर ते निष्फळ ठरेल, असे म्हणत न्या. मनीष पितळे यांनी पुढील सुनावणी ३० जुलै रोजी ठेवली.
वीर्य वापराबाबत नियम
जोपर्यंत ही याचिका प्रलंबित आहे तोपर्यंत फर्टिलिटी सेंटरने मृत व्यक्तीचे गोठविलेले वीर्य सुरक्षित ठेवावे आणि त्याची योग्यरीत्या साठवणूक करावी. विशेषत: एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे वीर्य साठवणुकीच्या आणि वापराच्या बाबतीत विशिष्ट नियम आहेत आणि संमतीनुसारच त्याचा वापर होऊ शकतो का? यासंबंधी सविस्तर सुनावणी घेऊ, असे न्यायालयाने म्हटले.
काय आहे प्रकरण?
या प्रकरणातील फेब्रुवारीत मृत्यू झाला, तेव्हा तो अविवाहित होता. मृत्यूनंतर आईने मुंबईतील फर्टिलिटी सेंटरकडे गुजरातमधील आयव्हीएफ केंद्रात मुलाचे वीर्य हस्तांतरित करण्याची परवानगी मागितली. आईच्या म्हणण्यानुसार, मुलाने कोणाशी सल्लामसलत न करता त्याच्या संमतीपत्रात वीर्याची विल्हेवाट लावण्यास सहमती दर्शविली.