Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई मेट्रोची ‘कमान’ महिलांच्या हाती; चार स्थानकांचे केले सारथ्य; महिला दिनानिमित्त राबविला विशेष उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 10:38 IST

आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून मुंबईतील चार मेट्रो स्थानकांचे संपूर्ण सारथ्य करण्याचे काम महिलांनी खंबीरपणे पार पाडले आहे.

मुंबई : आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून मुंबईतील चार मेट्रो स्थानकांचे संपूर्ण सारथ्य करण्याचे काम महिलांनी खंबीरपणे पार पाडले आहे. त्यातून स्त्रीशक्तीच्या कर्तृत्वाचा आगळावेगळा प्रत्यय मुंबईकरांना करून दिला. तसेच नारीशक्ती सर्वच कामे करू शकते याची प्रचिती या महिलांनी  दिली. 

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (एमएमआरसी) कफ परेड ते आरे मेट्रो ३ या भुयारी मार्गिकेवरील मरोळ नाका आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही अत्यंत गजबजलेली आणि महत्त्वाची स्थानके महिलांनी संचलित केली. त्यामध्ये स्थानक नियंत्रणापासून ते सुरक्षा रक्षकांपर्यंत सर्व जबाबदाऱ्या महिलांनी लिलया पेलल्या. 

दिवसभरातील विविध शिफ्टमध्ये मिळून सुमारे ८५ महिला कर्मचाऱ्यांनी या दोन्ही स्थानकांचे कामकाज पाहिले. यामध्ये स्थानक नियंत्रण, तिकीट खिडकी, प्रवासी सहाय्य, सुरक्षा तपासणी, तांत्रिक देखभाल आणि हाऊसकीपिंग अशा सर्व स्तरांवरील कामांचा समावेश होता. महामुंबई मेट्रो संचलन मंडळाच्या मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ मार्गिकेवरील एक्सर आणि आकुर्ली या दोन स्थानकांची जबाबदारी महिलांनी सांभाळली. 

महिला दिनानिमित्त मेट्राेच्या मरोळ नाका, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे तिकीट देण्यापासून इतर कामकाज महिला कर्मचाऱ्यांनी उत्तमरीत्या पार पाडले. 

भुयारी मेट्रोमध्ये १,३८८ महिला 

स्टेशन मास्तरच्या केबिनमधील महत्त्वाच्या निर्णयांपासून प्रवासी सुरक्षेची सर्वोतोपरी काळजी घेण्याचे काम महिलांनी केले. त्यातून एमएमएमओसीएलच्या अखत्यारितील या मेट्रो मार्गिकेवरील दोन स्थानकांनी खऱ्या अर्थाने स्त्रीशक्तीचा जागर अनुभवला. 

मुंबईतील पहिल्या भुयारी मेट्रोवर गाडीचे संचलन करण्यासाठी २७ महिला मेट्रो चालक कार्यरत आहेत. मेट्रोच्या सुरक्षित प्रवासात त्यांचा मोठा वाटा आहे. 

तर एमएमआरसीमध्ये सध्या विविध विभागांत एकूण १,३८८ महिला कर्मचारी कार्यरत आहेत. त्यातून मेट्रो संचलनाच्या प्रत्येक टप्प्यावर महिलांचे योगदान दिसत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai Metro: Women Take Charge on Women's Day

Web Summary : For International Women's Day, Mumbai Metro entrusted women with operating key stations. Eighty-five women managed operations at Marol Naka and Chhatrapati Shivaji Maharaj Terminus, showcasing their capabilities across all roles, from station control to security, highlighting women's crucial contribution to the metro's success.
टॅग्स :महिलामेट्रोरेल्वे