Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 12:41 IST2026-04-07T12:37:08+5:302026-04-07T12:41:28+5:30
Dahisar To Kashigaon Mumbai Metro Line 9: मुंबईची सीमा ओलांडून मिरा-भाईंदरला जोडणाऱ्या मेट्रो लाइन ९ चा पहिला टप्पा आजपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.

Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
Dahisar To Kashigaon Mumbai Metro Line 9:मुंबईची सीमा ओलांडून मिरा-भाईंदरला जोडणाऱ्या मेट्रो लाइन ९ चा पहिला टप्पा आजपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मेट्रो लाइन ९ च्या दहिसर ते काशिगाव या पहिल्या टप्प्याचे उदघाटन होणार आहे. यामुळे मिरा-भाईंदरकरांना आता थेट अंधेरीच्या गुंदवलीपर्यंत प्रवास करता येणार आहे.
मुंबईतील मेट्रो प्रकल्पांपैकी मेट्रो लाइन-९ ही सर्वात महत्त्वाची लाइन असून ती मेट्रो-७ ला जोडली गेलेली असल्याने प्रवाशांना थेट अंधेरीपर्यंत जाता येईल. आज उदघाटन केल्यानंतर प्रत्यक्षात उद्यापासून ही सेवा प्रवाशांना वापरता येईल. दहिसर ते काशिगाव मार्गावर गर्दीच्या वेळी दर ५ मिनिटं ५० सेकंदांनी गाडी धावणार आहे.
कार्यालयीन दिवसात गुंदवली ते काशिगावदरम्यान मेट्रो ९ वर गाडीच्या दरदिवशी २७६ फेऱ्या होणार आहेत. मेट्रो-९ च्या पहिल्या टप्प्यात दहिसर, पांडूरंग वाडी, मिरा गाव आणि काशीगाव अशी चार महत्त्वाची स्थानकं असणार आहेत. ही मेट्रो पूर्णपणे उड्डाणपूल स्वरुपातील आहे.
प्रवासाचा वेळ वाचणार
दहिसर ते काशीगाव मेट्रो मार्गामुळे प्रवाशांची जवळपास २० ते २५ मिनिटं वाचणार आहेत. कारण सध्या याच मार्गावर रस्ते मार्गाने प्रवास करायचा झाल्यास ३० ते ४५ मिनिटं लागतात. पण मेट्रो मुळे हे अंतर आता फक्त १० ते १५ मिनिटांमध्ये कापता येईल. तसंच रस्त्यावरील वाहतूककोंडीतूनही प्रवाशांची सुटका होईल. त्यामुळे मेट्रो-९ प्रकल्प मिरा-भाईंदरकरांसाठी गेमचेंजर प्रकल्प ठरणारा आहे. मिरा-भाईंदरला थेट मुंबईशी जोडणारा हा प्रकल्प आहे.
कसा आहे मेट्रो-९ चा मार्ग?
- मेट्रो लाईन 2ए आणि लाईन 7 या आता स्वतंत्रपणे चालवण्यात येणार असून, लाईन 7 ही लाईन 9 सोबत एकत्रितपणे (इंटिग्रेटेड कॉरिडॉर) चालणार आहे, ज्यामुळे अंधेरी पूर्व ते मीरा-भाईंदर (काशिगाव) दरम्यान थेट आणि अखंड प्रवास शक्य होणार आहे.
- मेट्रो लाईन 7 व लाईन 9 (संयुक्त कॉरिडॉर) गुंदवली ते काशिगाव
- लाईन 9 सुरू झाल्यानंतर लाईन 7 आता विस्तारित स्वरूपात कार्यरत राहील.
- मार्ग लांबी: 19.79 किमी
- पहिली गाडी: सकाळी सुमारे 5.50 वाजता
- शेवटची गाडी: रात्री सुमारे 11.00 वाजता
- गर्दीच्या वेळेत: सुमारे 5.50 मिनिटांनी गाड्या सुटतील
- इतर वेळेत: 8 ते 10 मिनिटे
- एकूण फेऱ्या: आठवड्याचे दिवस – 276, शनिवार – 223, रविवार – 205 फेऱ्या होतील.
मेट्रो लाइन-९ मधील स्थानकं कोणती?
मेट्रो लाइन-९ मध्ये एकूण ८ स्थानकं असणार आहेत. त्यातील ४ महत्त्वाची स्थानकं आज खुली होत आहेत. ज्यात दहिसर, पांडुरंगवाडी, मिरागाव आणि काशिगाव या स्थानकांचा समावेश आहे. तर उर्वरित साईबाबा नगर, मेदितीया नगर, सुभाषचंद्र बोस स्टेडियम आणि शहिद भगतसिंह गार्डन या चार स्थानकांचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.
तिकीट किती? (Ticket Price)
० ते ३ किमीसाठी- १० रुपये
१२ किमीसाठी- २० रुपये
१८ किमीसाठी- ३० रुपये
१८ ते २४ किमीसाठी- ४० रुपये
२४ ते ३० किमीसाठी- ५० रुपये
३० ते ३६ किमीसाठी- ६० रुपये
वरील तक्त्यानुसार आज उदघाटन होणाऱ्या दहिसर ते काशिगाव स्थानकांदरम्यानच्या प्रवासासाठी एकल तिकीट २० रुपये इतके असणार आहे.