ही कसली तयारी? तिकीट काउंटरला एकच कर्मचारी ! मेट्रो ३ साठी पहिल्याच दिवशी रांगा : डिजिटल तिकिटालाही अडचणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 10:08 IST2025-10-10T10:08:12+5:302025-10-10T10:08:57+5:30
मेट्रो ३ वर सोमवारी प्रवाशांना तिकीट घेण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागला. कफ परेड स्थानकावरील तिकीट व्हेंडिंग मशिन संरक्षणासाठी रिबिन लावून बंद ठेवली होती. स्थानकातील नेटवर्क समस्येमुळे खात्यातून पैसे वजा होत होते, मात्र तिकीट मिळत नव्हते, अशी तक्रार प्रवाशांनी केली.

ही कसली तयारी? तिकीट काउंटरला एकच कर्मचारी ! मेट्रो ३ साठी पहिल्याच दिवशी रांगा : डिजिटल तिकिटालाही अडचणी
- अमर शैला
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आरे ते कफ परेड भुयारी मेट्रो ३ ची आचार्य अत्रे चौक ते कफ परेड सेवा गुरुवारपासून सुरू झाली. मात्र, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (एमएमआरसी) अपुऱ्या तयारीचा प्रवाशांना फटका बसला. पहिल्याच दिवशी या मेट्रो मार्गिकेवर प्रवाशांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. अनेक स्थानकांवर तिकीट खिडकीवर एकच कर्मचारी असल्याने प्रवाशांना तिकिटासाठी बराच वेळ रांगेत उभे राहावे लागत होते.
कफ परेड मेट्रो स्थानकावर दोन बाजूंना तिकीट खिडकी आहे. या दोन्ही बाजूच्या तिकीट खिडकीवर केवळ एकाच कर्मचाऱ्याकडून तिकीट देणे सुरू होते. या स्थानकात दुपारी अडीचच्या सुमारास प्रवाशांच्या रांगा लागल्या होत्या. एमएमआरसीने मेट्रो स्थानकात तिकीट वेंडिंग मशीनद्वारे ऑनलाइन पेमेंट करून तिकीट काढण्याची सुविधा दिली आहे. मात्र, स्थानकात नेटवर्क नसल्याने प्रवाशांना या मशीनद्वारे तिकीट काढणेही शक्य नव्हते. प्रवाशांची रांग वाढतच असल्याने अखेर एमएमआरसीने तिकीट खिडकीत अतिरिक्त काऊंटर सुरू केले. त्यानंतर प्रवाशांना जलद तिकीट मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.
दरम्यान, एमएमआरसीने काही स्थानकांत वायफाय सुविधा दिली होती. मात्र, त्यावरूनही तिकीट काढताना प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागत होता.
व्हॉट्सॲप तिकिटासाठी नेटवर्क मिळेना
एमएमआरसीने व्हॉट्सॲप तिकिटाचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. क्यूआर कोड स्कॅन करून प्रवाशांना व्हॉट्सॲपद्वारे तिकीट मिळविता येते. मात्र, स्थानकात नेटवर्कच नसल्याने हे क्यूआर कोड नेटवर्कच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र होते.
मेट्रो ३ वर सोमवारी प्रवाशांना तिकीट घेण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागला. कफ परेड स्थानकावरील तिकीट व्हेंडिंग मशिन संरक्षणासाठी रिबिन लावून बंद ठेवली होती. स्थानकातील नेटवर्क समस्येमुळे खात्यातून पैसे वजा होत होते, मात्र तिकीट मिळत नव्हते, अशी तक्रार प्रवाशांनी केली.
एनसीएमसी कार्डमध्ये
पैसे भरता येईना
एनसीएमसी कार्डवरून मेट्रोचे तिकीट काढता येते. ज्या प्रवाशांकडे हे कार्ड होते, त्यांना कार्डमध्ये पैसे जमा करण्याची सुविधा नव्हती.
ही सुविधा सुरू होण्यासाठी आणखी काही दिवस लागण्याची शक्यता आहे. त्यातून प्रवाशांना रांगेत उभे राहून रोखीने तिकीट काढण्याशिवाय गत्यंतर नसेल.