मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार असून लवकरच आरे ते वरळी नाकापर्यंत मेट्रो धावणार आहे. मुंबईमेट्रो लाईन ३ मार्गावर शुक्रवारी (०९ मे २०२५) चाचणी होणार आहे. त्यानंतर शनिवारी (१० मे २०२५) हा टप्पा प्रवाशांसाठी खुला होणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या उद्घाटन करतील असे वृत्त आहे.
मेट्रो लाईन ३ ही मुंबईतील पहिली पूर्णपणे भूमिगत मेट्रो लाईन आहे. मेट्रो लाईन ३ च्या एकूण ३३.५ किमी लांबीच्या टप्पापैकी आरे जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड ते बीकेसी पर्यंतचा १२.६९ किमी लांबीचा टप्पा ७ ऑक्टोबर २०२४ पासून प्रवाशांसाठी खुला करण्यात आला. त्यानंतर उद्या आरे ते वरळीदरम्यान मेट्रोची चाचणी केली जाणार आहे. हा टप्पा एकूण २२ किलोमीटरचा आहे. हा टप्पा धारावी, दादर, सिद्धिविनायक, वरळी आणि बीकेसीसारख्या अनेक वर्दळीच्या भागांना जोडेल. मेट्रो लाईन ३ चे काम पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांना आरे डेपोपासून दक्षिण मुंबईतील कफ परेडपर्यंत जलद प्रवास करता येईल. यात मुंबई सेंट्रेल, छत्रपती शिवाजी महाराज आणि चर्चगेटसह एकूण २७ स्थानकांचा समावेश आहे.